Saturday, October 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षणाचा उद्देश पैसा कमावणे नसून, माणूस घडवणे असावा -राज्यपाल राजेंद्र आर्लेकर ...

शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणे नसून, माणूस घडवणे असावा -राज्यपाल राजेंद्र आर्लेकर   फ्युलचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

 

पुणे,दि. २४: शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली नोकरी मिळवणे, मोठे पॅकेज मिळवणेc आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे एवढाच मर्यादित नसावा. शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठीही झाला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहताना इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेचा २० वा स्थापना दिन आणि द्वितीय दीक्षांत समारंभाच्या ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते व्यवस्थापन तुकडी २०२४-२६ मधील विद्यार्थ्यांसह विविध सीएसआर-सहाय्यित प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. याच व्यासपीठावरून ‘फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी, पुणे’ या नूतन विद्यापीठाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली.

यावेळी स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप विद्यापीठ (फ्युएल) कुलपती डॉ. सुलभा देशपांडे, फ्युएलचे अध्यक्ष आणि कुलगुरू केतन देशपांडे, बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन, तसेच एसबीआय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) प्रत्युष मेहरोत्रा, आमदार राणा जगजितसिंह पाटील प्रा. मयूरी देशपांडे, ऑलकार्गो ग्रुपचे अध्यक्ष, शशी किरण शेट्टी उपस्थित होते.

राजेंद्र आर्लेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हातात पदव्या, डिप्लोमा आणि विविध प्रमाणपत्रे आहेत. मात्र, या पात्रतेचा उपयोग प्रत्यक्ष कामात कसा केला जाणार, समाजासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थी काय योगदान देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ भाषणे ऐकण्यापेक्षा त्यातील विचार कृतीत उतरविणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याच बरोबर शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगताना आर्लेकर म्हणाले, गुणवत्तायादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण, आर्थिक सुबत्ता, बंगला आणि महागड्या गाड्या मिळविणे म्हणजेच शिक्षणाचे यश आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षणातून चांगला माणूस घडविण्यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

फ्युएल मॉडेल हा शिक्षणाचा एक अनोखा दृष्टिकोन आहे, जो शैक्षणिक अध्ययन, व्यावहारिक कौशल्य विकास, उद्योग क्षेत्राशी सहयोग आणि उद्योजकता यांचा मेळ घालतो. तरुणांना व्यावसायिक जगासाठी सज्ज करण्याच्या दिशेने फ्युएल जे कार्य करत आहे, ते एक उत्तम उदाहरण आहे. शैक्षणिक संस्थांनी आणि देशातील प्रत्येक राज्याने याचा विचार करून, आपल्या स्थानिक गरजांनुसार ते स्वीकारायला हवे. असे आर्लेकर यांनी सांगितले.

 

डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले की, फ्युएलच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली असून, युवकांना कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर संस्थेने नेहमीच भर दिला आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनातून संस्थेच्या कार्याला योग्य दिशा मिळाली. २०२२-२६ या तुकडीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांचे वेतन त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट झाले आहे. उद्योगसमूहांच्या सहकार्याने डेटा सायन्स आणि फायनान्ससह विविध क्षेत्रांतील शिक्षणाचा विस्तार करण्यात येणार असून, उद्योगांशी थेट जोडलेले शिक्षण हेच या संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

गणेश मोहण म्हणाले, तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या संपत नाहीत, तर कामाची गती वाढून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. बदलत्या तंत्रज्ञानानुसार उत्पादनपद्धती आणि उद्योगांचे स्वरूप बदलते. विद्यार्थ्यांनी इतरांच्या हिताचे काम निवडावे, अधिकार मिळण्यापूर्वी नेतृत्वगुण विकसित करावेत आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवी संबंध जपावेत.

शशी किरण शेट्टी म्हणाले, ‘स्कूल ऑफ लॉजिस्टिक’ची स्थापना करण्यासाठी, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि तरुणांसाठी अधिक संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘फ्यूएल’सोबत सामंजस्य करार करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

डॉ प्राची आहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मयुरी देशपांडे यांनी आभार मानले.

———

कोटः

“केवळ पदव्या आणि नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. तरुणांमध्ये अशी कौशल्ये, आत्मविश्वास आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, ज्यामुळे ते इतरांसाठीही संधी निर्माण करू शकतील. आपले ध्येय केवळ ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, तर ‘नोकरी देणारे’ (रोजगार निर्माते) घडवण्याचे असायला हवे. शिक्षण, व्यावहारिक कौशल्ये आणि उद्योजकता यांची सांगड घालून, फ्युएल हे दाखवून देत आहे की आपण आपल्या तरुणांना स्वावलंबी कसे बनवू शकतो आणि त्यांना समाज व राष्ट्राच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी कसे सक्षम करू शकतो.”

-राजेंद्र आर्लेकर, माननीय राज्यपाल, केरळ आणि तामिळनाडू

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments