पुणे, दि. २६: रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढवण्यासह शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उप अभियानांतर्गत रब्बी ज्वारी सन २०२६- २७ योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ८६० बियाणे मिनीकिट म्हणजेच ६३४ क्विंटल रब्बी ज्वारी बियाणांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या तसेच दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या रब्बी ज्वारी पिकाला प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित वाणांच्या बियाणांचा लाभ मिळणार असून प्रतिकूल परिस्थितीतही पीक उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. रब्बी ज्वारी हे अन्नधान्याबरोबरच पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे पीक आहे.
कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान कमी करण्यास आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरित नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. उपलब्ध बियाणांचा योग्य वापर करावा आणि वेळेवर पेरणी करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
*एका मिनी किट मध्ये काय मिळणार ?*
या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एका मिनी किटमध्ये पुढील साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परभणी सुपरमोती, फुले यशोमती, पीकेव्ही शक्ती या सुधारित वाणांचे ४ किलो ज्वारी बियाणे, पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त जैविक खत, ज्वारी पिकाच्या योग्य लागवडीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
*” प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”*
या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टल द्वारे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे मिनीकिटचे वितरण करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे.
०००


