Tuesday, October 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedबारामतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले*  *– उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

बारामतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले*  *– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार* 

 

 

*ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहरशेठ वाघोलिकर यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली*

 

मुंबई, दि. २७ : बारामतीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ जवाहरभाई मोतीलाल शहा (वाघोलिकर) यांच्या निधनाने बारामतीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बारामतीच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जवाहरशेठ वाघोलिकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणतात की, जवाहरशेठ वाघोलिकर यांनी आयुष्यभर बारामतीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रासाठी समर्पित भावनेने काम केले. बारामती नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तसेच मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून बारामतीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ म्हणूनही त्यांचे कार्य मोठे होते.

 

जवाहरशेठ यांचे पवार कुटुंबाशी अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. बारामतीच्या विकासाबद्दल त्यांना विशेष आस्था होती. सामाजिक प्रश्नांबाबतची त्यांची तळमळ, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि विविध संस्थांना त्यांनी दिलेले नेतृत्व कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबानेही एक ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शक गमावला आहे.

 

जवाहरशेठ वाघोलिकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments