नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर २०२६ : सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी आणि डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असताना ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अॅमेझॉन इंडिया आणि केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत इंडियन सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (आय४सी) यांनी आपल्या संयुक्त जनजागृती मोहिमेचा विस्तार केला आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील ग्राहकांना ऑनलाइन घोटाळे ओळखणे, संशयास्पद संदेशांची पडताळणी करणे आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता येथील अॅमेझॉनच्या दहा लाख डिलिव्हरी पॅकेजेसवर ऑनलाइन खरेदीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीचे संदेश दिले जात आहेत. तसेच, ग्राहकांना बनावट डिलिव्हरी अलर्ट, रिफंडच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या विनंत्या, संशयास्पद पेमेंट संदेश आणि आकर्षक ऑफर्समागील संभाव्य धोके ओळखता यावेत, यासाठी डिजिटल संवादात्मक खेळाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी अॅमेझॉन आणि आय४सी यांनी आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने ‘रक्षम – नॅशनल एआय सायबरसिक्युरिटी हॅकेथॉन २०२६’ आयोजित केले आहे. व्हॉइस क्लोनिंग, डीपफेक आणि ऑनलाइन घोटाळ्यांचे नमुने ओळखण्यासाठी एआय-आधारित उपाय विकसित करणे हा यामागील उद्देश आहे. या हॅकेथॉनसाठी सुमारे पाच हजार नोंदणी झाल्या आहेत.
आय४सीचे संचालक निशांत कुमार म्हणाले, “सायबर धोके सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे जनजागृतीचे रूपांतर माहितीपूर्ण निर्णय आणि वेळेवर कृतीमध्ये होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाधारित नावीन्य आणि व्यावहारिक ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना धोक्याचे संकेत ओळखण्यास व ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल.”
अॅमेझॉन इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट – लीगल राकेश बक्षी म्हणाले, “ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन खरेदीचा अनुभव देणे हे आमचे प्राधान्य आहे. आय४सीसोबतच्या सहकार्यामुळे केवळ जनजागृती न करता ग्राहकांना संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि योग्य कृती करण्यासाठी सक्षम केले जात आहे.”
सायबर फसवणुकीला बळी पडल्यास किंवा संशयास्पद व्यवहार लक्षात आल्यास नागरिकांनी त्वरित राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात
आले आहे.


