Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedचित्रमंडईत रंगली कलांची मैफल - रंग रेषेसह कल्पकतेचा उत्सव -...

चित्रमंडईत रंगली कलांची मैफल – रंग रेषेसह कल्पकतेचा उत्सव – कला, संस्कृती अन् स्वावलंबनाचा संगम – कलाकृतींचे प्रदर्शन, प्रात्यक्षिके आणि थेट विक्रीला प्रतिसाद

 

पुणे : भारतीय पारंपरिक कला, लोककला, हस्तकला आणि आधुनिक कलाप्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच कलाकारांना आर्थिक स्वावलंबनाची संधी देणारा ‘चित्र मंडई २०२६’ हा राष्ट्रीय कला, संस्कृती आणि स्वावलंबन महोत्सव पुण्यात प्रथमच उत्साहात पार पडला. जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे अंतर्गत ‘सामवेद’ कला, संगीत, दृश्यीकरण, मनोरंजन व अभिकल्प विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील जंगली महाराज रस्त्यावरील पादचारी मार्गावर हा महोत्सव रविवार, १ नोव्हेंबर रोजी पार पडला.

चित्रमंडईचे उद्घाटन कुलगुरू आर. डी. खराडकर प्र-कुलगुरू वैभव हेंद्रे, कलाकार प्रतिभा अहिरे, कार्टूनिस्ट घनश्याम देशमुख, एपीआय सपना देवतळे आणि डॉ. अविनाश काटे यांच्या हस्ते पार पडले.

या उपक्रमासाठी देशभरातून २५० हून अधिक कलाकारांनी नोंदणी केली होती. त्यामधून निर्धारित निकषांनुसार ६० कलाकारांची निवड करण्यात आली. या कलाकारांनी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन, प्रत्यक्ष कलानिर्मिती, विविध कलाप्रकारांची प्रात्यक्षिके आणि कलाकृतींची थेट विक्री अशा माध्यमांतून पुणेकरांसमोर आपली कला सादर केली. त्यामुळे कलाकारांना केवळ आपली कला प्रदर्शित करण्याचीच नव्हे, तर तिच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचीही संधी उपलब्ध झाली.

चित्रकला, पारंपरिक कला, लोककला, शिल्पकला, कुंभारकला, हस्तकला, आधुनिक आणि संगणकीय कलाप्रकारांचा या महोत्सवात समावेश होता. कलाकारांनी नागरिकांसमोर प्रत्यक्ष कलानिर्मिती करून विविध कलाप्रकारांची माहिती दिली. त्यामुळे कलानिर्मितीची प्रक्रिया जवळून अनुभवण्याची संधी कलारसिकांना मिळाली. कलाकार आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद घडून आला. अनेक कलाकारांच्या कलाकृतींची विक्री झाल्याने या उपक्रमाला व्यावसायिक दृष्टिकोनातूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

रायसोनी शिक्षण समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी, कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर आणि प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला. या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सामवेदचे अधिष्ठाता डॉ. अविनाश काटे, प्रा. देवेंद्र पोटदुखे आणि प्रा. मधुकर चंदनशिवे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच विद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि रायसोनी शिक्षण समूहातील सहकार्‍यांनी विविध जबाबदार्‍या सांभाळत महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

——————————

-पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या महोत्सवाला ज्येष्ठ नागरिक, कला क्षेत्रातील मान्यवर, कलारसिक, विद्यार्थी, तरुणाई तसेच नव्या पिढीतील नागरिकांनी दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक कला आणि आधुनिक कलामाध्यमांचा एकाच ठिकाणी अनुभव घेता आल्याने नागरिकांनी कलाकारांशी संवाद साधत त्यांच्या कलाकृतींची खरेदी केली. विशेषतः नव्या पिढीतील तरुणांनी विविध कलाप्रकारांमध्ये रस दाखविला.

————————–

मान्यवरांची उपस्थिती

महोत्सवाला पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासन, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा व मार्गदर्शन केले. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश बनकर, डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाबासाहेब धवळे, सहायक आयुक्त अशोक घोरपडे, नाशिक येथील मैत्रेयी कला स्टुडिओच्या संस्थापक व कलाकार प्रतिभा अहिरे, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता.

———————

दरवर्षी आयोजन करण्याची कलाकारांची मागणी —————————-

पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कला, संस्कृती आणि कलाकारांचे आर्थिक स्वावलंबन यांचा संगम घडविणारा हा अभिनव उपक्रम ठरला. महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता उपस्थित कलाकार, कलारसिक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी ‘चित्र मंडई’चे आयोजन दरवर्षी नियमितपणे करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

——————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments