किशोरावस्थेपासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत महिलांच्या महिलांसाठी आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे पुण्यातील अशा प्रकारचे पहिले केंद्र
पुणे, २९ ऑक्टोबर २०२६ : चेलाराम फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील बावधन येथे ‘चे चेलाराम वुमन्स हेल्थ सेंटर ’चे (सीडब्ल्यूएचसी) उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन सर्वांगीण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
चेलाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टिस्पेशालिटीच्या जवळ असलेल्या या केंद्रात किशोरवयीन मुलींचे आरोग्य, प्रजनन आरोग्य, रजोनिवृत्तीच्या काळातील आरोग्य व्यवस्थापन, आहार व पोषणविषयक मार्गदर्शन, जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रतिबंध व व्यवस्थापन, कर्करोग तपासणी, हाडांच्या आरोग्याची तपासणी तसेच प्रौढांसाठी लसीकरण अशा विविध सेवा उपलब्ध आहेत.
या केंद्राचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), माजी कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून कर्नल प्रा. (डॉ.) हेमलता के. बागला, कुलगुरू, एचएसएनसी विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ उपस्थित होत्या. तसेच ज्येष्ठ समाजसेविका लीला पूनावाला, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन, संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विंग कमांडर (डॉ.) हर्षल मोरे (निवृत्त), ,चेलाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टीस्पेशालिटीच्या वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. वेदवती पुरंदरे, चेलाराम वुमन्स हेल्थ सेंटरच्या प्रमुख आणि महिला आरोग्य सल्लागार डॉ. मंजुषा घुमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, “आजार झाल्यानंतर उपचार करण्यापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आणि एकात्मिक आरोग्यसेवेच्या माध्यमातून निरोगी आयुष्याला प्राधान्य देण्याच्या दिशेने हे केंद्र एक महत्त्वाचे पाऊल आहे. आज कमी वयातच महिलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आयुष्यभर सर्वसमावेशक आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. चेलारामसारख्या संस्था संशोधन, शिक्षण आणि प्रत्यक्ष रुग्णसेवा यांची सांगड घालू शकतात. त्याचबरोबर आरोग्यसेवांपासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.”
कर्नल प्रा. (डॉ.) हेमलता के. बागला म्हणाल्या, “महिलांच्या आरोग्याशी संबंधित पाच महत्त्वाच्या टप्प्यांवर आणि बाबींवर या केंद्राने दिलेला भर विशेष महत्त्वाचा आहे. यामध्ये पहिली मासिक पाळी (मेनार्की), मातृत्व आरोग्य (मॅटर्नल हेल्थ), मध्यम वयातील आरोग्य (मिडलाइफ), रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आणि मानसिक आरोग्य (मेंटल हेल्थ) यांचा समावेश आहे. आरोग्यविषयक जनजागृती, समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे आणि विविध विद्याशाखांमधील संयुक्त संशोधनाला चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्था व आरोग्य केंद्रांमध्ये अधिक सहकार्य होणे आवश्यक आहे. अशा सहकार्यातून आरोग्यविषयक माहिती आणि सेवा समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता येतील.”
चेलाराम फाउंडेशनचे अध्यक्ष लाल चेलाराम यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले, “महिलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्या आरोग्याच्या गरजाही बदलत असतात. या सर्व गरजा लक्षात घेऊन एकाच छताखाली शास्त्रीय आधारावर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या सेन्टर चा उद्देश आहे. आजारांचे लवकर निदान, उपचार, संशोधन आणि समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर आमचा भर असेल. विशेषतः भारतीय महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत अधिक सखोल माहिती आणि समज विकसित करण्याचाही आमचा प्रयत्न आहे.”
शोभना चेलाराम यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले, “महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या गरजांना अधिक प्राधान्य देतात. महिलांना आपल्या आरोग्याच्या समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात, त्यांचे म्हणणे समजून घेतले जावे आणि त्यांना आदराने व विश्वासाने आरोग्यसेवा मिळावी, असे वातावरण या केंद्रात निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. विविध तपासण्या, उपचार समुपदेशन आणि संवेदनशीलतेने दिले जाणारे मार्गदर्शन व सहकार्य या सर्व सुविधा महिलांना येथे उपलब्ध असतील.”
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले, “आमच्या मधुमेह उपचार केंद्रातील सर्वांगीण आरोग्यसेवेच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन हे चेलाराम वुमन्स हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये हे केंद्र कार्यान्वित होणार असून येथे अंतःस्रावी ग्रंथीविकार, शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार आणि इतर वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञ डॉक्टर एकत्रितपणे सेवा देणार आहेत. आजारांचे लवकर निदान, योग्य वेळी उपचार आणि प्रत्येक महिलेच्या गरजेनुसार वैयक्तिक आरोग्यसेवा देण्यावर आमचा भर असेल. महिलांना विविध आरोग्यसेवा अधिक सुलभपणे आणि समन्वयाने उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.”
चेलाराम वुमन्स हेल्थ सेंटर च्या प्रमुख आणि महिला आरोग्य सल्लागार डॉ. मंजुषा घुमरे म्हणाल्या, “महिलांचे आरोग्य हे केवळ एका वैद्यकीय शाखेपुरते किंवा आजार झाल्यानंतरच्या उपचारांपुरते मर्यादित नाही. त्यामुळे आमच्या सेंटर मध्ये आजारांना प्रतिबंध, लवकर निदान, जीवनशैलीचे योग्य व्यवस्थापन आणि आवश्यक वैद्यकीय उपचार यांचा एकत्रित विचार केला जाणार आहे. महिलांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे
.”


