Monday, November 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला बारामती शहरासह तालुक्यातील पावसाचा आढावा* ...

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला बारामती शहरासह तालुक्यातील पावसाचा आढावा* *नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या;*  *आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेऊन आवश्यक त्या उपाययोजना करा* *-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश*

 

 

मुंबई, दि.2 :- बारामती शहरासह तालुक्यातील काही भागांत आज पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. बारामती शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांत, विशेषतः भिगवण रोड परिसरात पाणी साचले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पावसाचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

 

बारामती शहर परिसरात साधारण 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले असले, तरी कोणतीही पडझड अथवा जीवित-वित्तहानी झालेली नाही. तसेच सध्या पूरस्थितीचा कोणताही धोका नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिली.

 

शहरातील भिगवण रोडसह ज्या भागांत पाणी साचले आहे, त्या ठिकाणी तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणून जनजीवन सुरळीत सुरू राहील, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे. आवश्यक ती आपत्कालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ सज्ज ठेवावे. शहरासह तालुक्यातील पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक ग्रामस्थांना, नागरिकांना तसेच प्रवाशांना त्रास होता कामा नये. त्यांच्या सुरक्षिततेला आणि जनजीवन सुरळीत ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

 

तसेच बारामती शहर आणि तालुक्यात पावसामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीची संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. परिस्थितीवर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवून नागरिकांना तातडीने दिलासा मिळेल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments