• हेरिटेज इंडियाच्या २८० पानांच्या देखण्या कॉफी टेबल ग्रंथात संस्कृतीच्या उदयापासून राज्यनिर्मितीपर्यंतचा महाराष्ट्राचा प्रवास.
• ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि डॉ. अरविंद जामखेडकर प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अतिथी.
पुणे, ३१ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा वेध घेणाऱ्या ‘गिफ्ट ऑफ द सह्याद्रीज: द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी फोर्स मोटर्स लि.चे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते झाले. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या सोहळ्याला अभ्यासक, वाचक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांनी प्रकाशित केलेला हा ग्रंथ संस्कृतीच्या उदयापासून १ मे १९६० रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंतचा कालखंड उलगडतो. त्याची सुरुवात मात्र प्रागैतिहासिक काळ आणि या भूमीचे आद्य रहिवासी असलेले आदिवासी यांच्या थोडक्यात परिचयाने होते.
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेले डॉ. फिरोदिया या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, तसेच इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे माजी अध्यक्ष आणि मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन या अभिमत विद्यापीठाचे विद्यमान कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर हे सन्माननीय अतिथी होते. दोघेही ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि प्राच्यविद्या अभ्यासक आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासाकडे जगाचे लक्ष वेधले जात असतानाच हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. २०२५ मध्ये ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आणि त्यांना अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या पंक्तीत स्थान मिळाले. या स्थळांमागची कहाणी, आणि त्याहूनही बरेच काही, ‘गिफ्ट ऑफ द सह्याद्रीज’ उलगडून दाखवतो.
या प्रसंगी हेरिटेज इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजिरी खांडेकर म्हणाल्या, “आपण कुठून आलो हे ज्या समाजाला ठाऊक नसते, त्याला आपण कुठे चाललो आहोत हेही उमगत नाही. गेली जवळपास दोन दशके हेरिटेज इंडिया पर्यटन सहली, नियतकालिके आणि पुस्तके यांच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांच्या मुळांची जाणीव जागवत आहे. इतिहास बंद दप्तरखान्यांत नव्हे, तर घराघरांत, वर्गखोल्यांत आणि रोजच्या गप्पांमध्ये रुजायला हवा, ही आमची धारणा आहे. सखोल आशयाला सौंदर्याची जोड मिळाली की वाचक किती मनापासून दाद देतात, हे आमच्या ‘पुण्यकथा: पुण्याची दशलक्ष वर्षांची कहाणी’ या ग्रंथाने दाखवून दिले. त्यामुळे ‘पुण्यकथा’च्या लेखिका आणि गेली बारा वर्षे आमच्यासाठी लेखन करणाऱ्या कल्याणी यांनी महाराष्ट्राची दोन हजार वर्षांची कहाणी सांगण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा हे काम छोट्या स्वरूपात करण्याचा प्रश्नच नव्हता. अभ्यासात काटेकोर, दृश्यरूपात समृद्ध आणि हाती धरताच आनंद देणारा कॉफी टेबल ग्रंथ साकारायचा, असे आम्ही ठरवले.”
पत्रकार आणि लेखिका कल्याणी सरदेसाई यांनी या ग्रंथाचे लेखन आणि सर्जनशील संकल्पन केले आहे. त्या म्हणाल्या, “दीर्घकाळ इतिहासाकडे केवळ तज्ज्ञांची मक्तेदारी म्हणून पाहिले गेले. तो तळटीपांमध्ये आणि चर्चासत्रांच्या दालनांत बंदिस्त राहिला. पण इतिहास म्हणजे शेतकरी आणि सैनिक, संत आणि समाजसुधारक, आणि अशा सामान्य कुटुंबांची कहाणी, ज्यांच्या शतकानुशतकांच्या निर्णयांनी आपले आजचे जग घडवले. हा ग्रंथ म्हणजे ही कहाणी तिच्या खऱ्या वारसदारांना परत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला आणखी एक पाठ्यपुस्तक लिहायचे नव्हते. महाराष्ट्राची कहाणी तिला साजेशा पद्धतीने, नाट्य, काव्य आणि भावनेसह, पण तथ्यांशी जराही तडजोड न करता सांगायची होती. म्हणूनच प्रत्येक पानावर संशोधन झाले, चर्चा झाली, पुनर्लेखन झाले; आणि प्रत्येक पान सत्याला धरून आहे आणि तितकेच जिवंत आहे, याची खात्री होईपर्यंत ते तज्ज्ञांकडून तपासून घेतले गेले.”
या प्रसंगी बोलताना डॉ. अभय फिरोदिया म्हणाले: “जेव्हा आपण इतिहासाबद्दल लिहितो, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की केवळ ज्ञानामुळेच नव्हे, तर व्यापारामुळेच भारत सुमारे ५,००० वर्षे जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांपैकी एक बनला होता. १७५० पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक होते आणि त्यात व्यापाराचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे, आज महाराष्ट्राची समृद्धी औद्योगिकीकरण, उद्यमशीलता आणि कौशल्य विकासावर अवलंबून आहे. सरतेशेवटी, ज्ञान आणि संस्कृतीला व्यापार आणि विस्तारानेच चालना मिळाली पाहिजे.”
डॉ. जी. बी. देगलूरकर यांनी इतिहास सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्याबद्दल ‘हेरिटेज इंडिया’ची प्रशंसा केली.
त्याचप्रमाणे डॉ. अरविंद जामखेडकर म्हणाले: “महाराष्ट्राचा प्रवास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पुस्तकाची आवश्यकता आहे.”
महाराष्ट्रावर स्वतंत्र ग्रंथ होणे ही फार पूर्वीपासूनची गरज होती, असे सरदेसाई यांनी नमूद केले. “महाराष्ट्र ना उत्तरेचा, ना दक्षिणेचा. त्याची स्वतःची ओळख आहे, आणि त्याची संस्कृती त्याच्या भूप्रदेशाइतकीच वेगळी आहे,” असेही त्या म्हणाल्या.
या कहाणीच्या केंद्रस्थानी सह्याद्री आहे. सह्याद्री म्हणजे केवळ पार्श्वभूमीतील डोंगररांग नव्हे. जगातील सर्वाधिक जैवविविधतेने नटलेल्या प्रदेशांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटाचा तो भाग आहे. त्याच्या कड्यांवर मान्सूनचे ढग अडतात, तिथेच गोदावरी, कृष्णा आणि भीमा उगम पावतात, आणि त्याच्याच कातळात भव्य लेणी कोरली गेली. शतकांनंतर हाच सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नैसर्गिक तट ठरला.
दहा वर्षे व त्यापुढील वयाच्या वाचकांसाठी लिहिलेला हा ग्रंथ महाराष्ट्राच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडांतून प्रवास करतो. सह्याद्रीच्या भूगोलाने या प्रदेशाचा इतिहास कसा घडवला, हे तो दाखवतो आणि येथील अद्भुत शैलकोरीव लेणी व किल्ल्यांचा वेध घेतो. आधीच्या पडझडीने या प्रदेशाचे लोकोत्तर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उदयाची भूमी कशी तयार केली, याचा मागोवा तो घेतो. पेशवाईचा उत्कर्ष आणि अस्त, तसेच शिक्षण, पत्रकारिता, समाजसुधारणा, बहुसांस्कृतिकता आणि नवोन्मेष यांचे केंद्र म्हणून महाराष्ट्राचा उदय यांचा आलेख तो मांडतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि १ मे १९६० रोजी झालेली राज्यनिर्मिती हा या कहाणीचा कळसाध्याय आहे.
ग्रंथाच्या संशोधन मंडळात इतिहासकार डॉ. अजित आपटे, प्रा. प्र. के. घाणेकर आणि डॉ. मंजिरी भालेराव यांचा समावेश आहे. राहुल देशपांडे, अनंत देरे, तेजस मोडक आणि मधुमिता शिंदे यांनी ग्रंथातील चित्रे रेखाटली आहेत.
हा एकदा वाचून बाजूला ठेवण्याचा ग्रंथ नाही. पिढ्यानपिढ्या जपावा असा हा संग्राह्य ठेवा आहे. शाळांची ग्रंथालये असोत वा घरातील पुस्तकांचे कपाट, तो सर्वत्र शोभून दिसेल. दिवाळीच्या तोंडावर प्रकाशित झालेला हा ग्रंथ सणासुदीची एक मोलाची भेटही ठरेल.
ग्रंथाचा तपशील
शीर्षक: गिफ्ट ऑफ द सह्याद्रीज: द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र
प्रकाशक: हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.
पृष्ठसंख्या: २८०
किंमत: ₹ २,५००
हेरिटेज इंडियाविषयी
हेरिटेज इंडिया ही पुण्यातील पर्यटन, प्रकाशन आणि शैक्षणिक संस्था २००७ पासून भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. ‘हेरिटेज इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ ही नियतकालिके, तसेच ‘पुण्यकथा: पुण्याची दशलक्ष वर्षांची कहाणी’ हा कॉफी टेबल ग्रंथ ही संस्थेची प्रकाशने आहेत.
संकेतस्थळ: www.heritage-india.com ई-मेल: info@heritage-india.com
माध्यम संपर्क: उषा करनानी, इन्स्पि
रेशन्स पीआर, 98231 40200


