पुणे, दि. २ (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या ‘जीवन प्रमाण’ अॅप व पोर्टलच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष न जाता मोबाईलद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येते.
यासाठी भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागामार्फत १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील २ हजार शहरे व जिल्ह्यांमध्ये पाचवी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी आज रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे येथे भेट देऊन अभियानाचा आढावा घेतला.
यावेळी लेखा व कोषागारे, पुणे विभागाच्या सहसंचालक भारती देशमुख, वरिष्ठ कोषागार अधिकारी गायत्री तुकाराम जाधव, निवृत्तीवेतन विभागातील अधिकारी, निवृत्तीवेतनधारक संघटनेचे पदाधिकारी आणि निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.
भेटी दरम्यान श्री. गुप्ता यांनी निवृत्तीवेतन शाखा व निवृत्तीवेतन शाखेतील लेखा लिपिक यांच्याशी संवाध साधून जीवन प्रमाणपत्र संकेतस्थळावर असणाऱ्या सुधारणांबाबत माहिती घेतली. तसेच उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाण पोर्टलवर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली.
यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी गायत्री तुकाराम जाधव यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ पोर्टलचा वापर करून डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन केले.
0000


