Monday, November 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष;काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र...

माजी मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष;काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केला निषेध व्यक्त!

 

 

पिंपरी(प्रतिनिधी)दि. २ नोव्हेंबर २०२६ :-पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आज(दि.२) मुख्य इमारती परिसरात आदरांजली वाहण्यात आली नाही तसेच राम रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील तैल चित्राला साधा पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले नसल्याने काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निषेधार्थ त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये स्व प्रा रामकृष्ण मोरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

पत्रात म्हटले की,प्रा. स्व.रामकृष्ण मोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शहराच्या विकासाला दिशा देणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेकडून अभिवादन न होणे ही बाब अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आणि शहरवासीयांच्या भावना दुखावणारी आहे.

 

प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नाव शहराच्या विकासाशी जोडलेले असून, त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान राखणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, पुण्यतिथीच्या दिवशी साधा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची औपचारिकताही पार पाडण्यात आली नसल्याने महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवावा. तसेच, पुण्यतिथीच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी.

 

या शहराला दूरदृष्टी ने विकासित करणारे आणि पिंपरी चिंचवड सारख्या एका साध्या गावाला आशिया खंडाच्या जागतिक पातळीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचे कार्य केलेले,वाय सी एम रुग्णालयाची निर्मिती असेल शहरामध्ये सांस्कृतिक कार्यासाठी निर्माण केलेले प्रेक्षागृह आणि इतरही महत्वाचे शहरातील कार्य आणि शिक्षण मंत्री असताना पहिलीपासून इंग्रजी आणि आईचे नाव दाखल्यावर ठेवण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतलेले, स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांचे नाव हे दिवंगत मान्यवरांच्या जयंती पुण्यतिथी मध्ये आदरांजली वाहावयाच्या यादीमध्ये नसावा ही बाब शहरवासीयांसाठी अत्यंत खेदजनक, निराशाजनक आणि संताप निर्माण करून देणारी आहे.तात्काळ स्व. प्रा. रामकृष्ण मोरे सरांचे नाव हे सदर आदरांजली वाहण्याच्या मान्यवरांच्या यादीमध्ये समाविष्ट करून

घ्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments