पुणे,दि. ५:कोल्हापूर येथील संजीवनी स्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई फुटबॉल स्पर्धेत नांदे येथील ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’च्या अंडर-१४ मुलांच्या फुटबॉल संघाने चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशासह संघाने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
संपूर्ण स्पर्धा कालावधीत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी विलक्षण जिद्द, आत्मविश्वास, उच्च दर्जाची शिस्त, संघभावना आणि विजयासाठीची लढाऊ वृत्ती यांचे अप्रतिम दर्शन घडवले. अत्यंत अनुभवी संघांविरुद्ध मैदानात उतरून त्यांनी ज्या ताकदीने मुकाबला केला, तो खेळ निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरला.
कठोर परिश्रम आणि मार्गदर्शनाचे फलित
खेळाडूंचे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाप्रती असलेले समर्पण यायशामागे असल्याचे दिसून येते. या दैदिप्यमान यशात संघाचे प्रशिक्षक श्री. अमेय कलाटे यांच्या मार्गदशनाचे मोलाचे योगदान लाभले असून, त्यांच्या या उत्कृष्ट प्रशिक्षणशैलीबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशोवर्धन मालपाणी व प्राचार्या संगीता राऊतजी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या या युवा शिलेदारांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


