पुणे, दि. ११ : जागतिक लॅण्डस्केप आर्किटेक्चर (भूदृश्य वास्तूविद्या) महिन्याचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील लॅण्डस्केप विभागातर्फे ‘लिव्हींग विज्डम’ या कोकणामधील असूद या गावातील बागांना पारंपरिक तरी व्यवहार्य पद्धतीने करण्यात येत असणाऱ्या शाश्वत पाणीवाटपावर आधारित ई-बुकचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या उपस्थितीत या ई-बुकचे प्रकाशन झाले. त्यावेळी ज्येष्ठ सांस्कृतिक भूदृश्य वास्तूविद्या अभ्यासक डॉ.अमिता सिन्हा, कोकण कृषी विद्यापीठातील ज्येष्ठ निवृत्त प्राध्यापक डॉ. एस. पी. राऊत, या ई-बुकच्या संपादक आणि बीएनसीएतील लॅण्डस्केप विभागप्रमूख डॉ.स्वाती सहस्रबुद्धे, संस्थेतील प्रकाशन विभागप्रमूख प्रा. स्मिता ओगले, प्रा. स्नेहल मिजार, प्रा. क्षितिजा कोल्हटकर, प्रा. अनुपमा खटावकर, प्रा. नेहा अडकर, तसेच २०२२ मध्ये या प्रकल्पात सहभागी झालेल्या बीएनसीएतील माजी पदव्युत्तर विद्यार्थिनी राधा किंजवडेकर आणि तेजल हुंडेकर यावेळी उपस्थित होत्या.
लॅण्डस्केप आर्किटेक्चर (भूदृश्य वास्तूविद्या) हा वास्तूरचनाकार म्हणून आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. वैविध्यपूर्ण भृदृश्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोकणाचा वारसा हा कायम अभ्यासकांना खुणावणारा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर अधिक काम करणे शक्य आहे, असे डॉ. कश्यप यांनी सांगितले.
निसर्गावर आधारित मानवी संस्कृतीचा विकास पाहता आपल्याला उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या संतुलित वापरासाठी पारंपरिक ज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. जागतिक तापमानवाढीच्या या कालखंडात आपल्याला पुन्हा एकदा या कोकणातील पारंपरिक निसर्गाकडे नेणाऱ्या व व्यवहार्य उपाय शिकविणाऱ्या गोष्टींकडे कडे वळावे लागेल, असे मत डॉ. सिन्हा यांनी नोंदवले.
असूद मधील सर्व बागांसाठी लागणाऱ्या पाणी वाटपात गेली ३०० वर्षे याच पारंपरिक ज्ञानाचा अवलंब करत सातत्य ठेवण्याच्या या आश्चर्यकारक कामगिरीचा अभ्यास करणारे हे संदर्भ पुस्तक अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, कृषी क्षेत्रातील आपले पारंपरिक ज्ञान नष्ट होत असताना असूदमधील बागांना पुरवण्यात येत असणाऱ्या पाणी वाटपाबाबत अभ्यास करून त्याचा कायमस्वरूपी दस्तावेज तयार करावा असे वाटले. हे ई-बुक लवकरच छापील पुस्तकाच्या स्वरूपात तसेच त्याच्या जोडिला संक्षिप्त मराठीमध्येही प्रकाशित करण्याची आमची योजना आहे.
असूदमधील शाश्वत बागा व शेतीच्या बाबत बोलताना डॉ. राऊत म्हणाले की, तेथील निसर्ग समृद्धी, जैवविविधता, जलाशयातील जैवविविधता आणि पुरेसा पाऊस यातून हा परिसर कायम सुजलाम सुफलाम झाला आहे.
‘समृद्ध आसूद, जणू एक सांस्कृतिक मेळावा, उदंड वारशाचा, धार्मिक मूल्यांचा, प्रादेशिक विविधतेचा, पारंपरिक प्रणालीचा व निसर्ग आणि मनुष्याच्या समतोलाचा’ या काव्यमय शब्दात या पुस्तकाचे वर्णन प्रा. अमृता बर्वे यांनी केले. देवश्री डेग्वेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. अनुपमा खटावकर यांनी आभार मानले.


