पुणे : निरोगी जीवनशैली, रोगप्रतिबंध आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करत ‘उद्याच्या निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर आधारित धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम विश्वानंद केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला. आयुर्वेद हा केवळ उपचाराचा मार्ग नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा आधार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
सातव हॉल, अरण्येश्वर, पुणे येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मीना पाटणकर उपस्थित होत्या. विश्वानंद केंद्राचे संस्थापक विश्वस्त राजकुमारजी चोरडिया तसेच मेडिकल डायरेक्टर डॉ. अजितकुमार मंडलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, आरोग्यसेवक, विश्वानंद केंद्राचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी भगवान धन्वंतरी यांचे विधिवत पूजन करून सर्वांच्या उत्तम आरोग्याची व निरोगी जीवनाची प्रार्थना करण्यात आली. विश्वानंद केंद्राच्या माध्यमातून आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र, फिजिओथेरपी, योग आणि इतर पूरक उपचारपद्धतींचा समन्वय साधून सर्वांसाठी एकात्मिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.


