Saturday, November 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रकाशन विश्वातील प्रयोगशील, मार्गदर्शक दुवा निखळला* *मुख्यमंत्री देवेंद्र...

प्रकाशन विश्वातील प्रयोगशील, मार्गदर्शक दुवा निखळला* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना श्रद्धांजली*

 

 

मुंबई, दि. ७: – मराठी प्रकाशन विश्वात विश्वासार्ह अशी व्यावसायिकता आणि प्रयोगशीलता राबवून अनेक उद्योन्मुख साहित्यिकांची जगाला ओळख करून देणारे ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांच्या निधनाने साहित्य आणि प्रकाशन क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

दिवंगत अनिल मेहता यांनी पुस्तक विक्रेता म्हणून सुरवात केली. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रकाशन विश्वात विश्वासार्ह अशी व्यावसायिकता राबविली. त्यांनी नेहमीच नवनव्या लेखक-कवींचा शोध घेतला. त्यांचे साहित्य प्रकाशित करून, त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले. त्यांच्या साहित्याची जगाला ओळख करून दिली. इतर भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठीतील साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्याच्या उपक्रमातून त्यांनी प्रयोगशीलता राबविली. त्यांनी वाचक चळवळीलाही पाठबळ दिले. यामुळे अनेक दिग्गज साहित्यिकांसह, नवोदितांनाही रसिक वाचकांशी संवाद साधता आला. व्यावसायिक धडाडी आणि प्रकाशनाविषयीची आत्मीयता यातून त्यांनी प्रकाशित केलेली वैविध्यपूर्ण अशी ग्रंथसंपदा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मोठा ठेवा ठरणार आहे. या पुस्तकांच्या रूपाने मेहता यांच्या स्मृती चिरंतन राहतील. मेहता यांच्या निधनामुळे प्रकाशन विश्वावर, त्यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ प्रकाशक, मेहता पब्लिशिंग कंपनींचे संस्थापक अनिल मेहता यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments