पुणे : भारत माता की जय… वंदे मातरम… च्या जयघोषात सन १९६२ ते १९९९ च्या युद्धातील बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना मानवंदना देत पुणेकरांनी त्यांच्यासोबत आगळीवेगळी भाऊबीज साजरी केली. भारतीय सैनिकांसह वीरमाता आणि वीरपत्नी यांनी देशासाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांचा त्याग अवर्णनीय असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
सैनिक मित्र परिवार, सेवा मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन, नारद मंदिर, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटना आणि सहयोगी संस्थांच्या वतीने शहीद आणि बेपत्ता जवानांच्या वीर पत्नींची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संपादक व पत्रकार विजय कुवळेकर, चंदूकाका सराफ पेढीचे संचालक अतुल शहा, रोटरी क्लबच्या डॉ.शुभदा जठार, नारद मंदिराचे अध्यक्ष डॉ.विलासबुवा परांजपे, हरी गणेश साने प्रतिष्ठानचे संजय गोखले, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ महाडिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
साडी, मिठाई, तिरंगी उपरणे, चांदीचे नाणे आणि भेटवस्तू प्रत्येक वीरपत्नीला भाऊबीज म्हणून देण्यात आली. चंदूकाका सराफ पेढी आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने या उपक्रमाला विशेष सहकार्य केले. रेखा देशपांडे, नितीन पंडित, गिरीश पोटफोडे, पराग गुजराथी, अमर लांडे, शेखर कोरडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
विजय कुवळेकर म्हणाले, ज्या सैनिकांमुळे आपण आनंद साजरा करू शकतो, त्या सैनिकांची आठवण ठेवणे हे महत्वाचे आहे. सैनिकांसह त्यांच्या कुटुंबाची आठवण ठेवणे हे आपले राष्ट्र कर्तव्य आहे. सैनिकांविषयी चार लोकांना जाणीव असणे पुरेसे नाही, तर संपूर्ण समाजाला जावीं असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, सन २००१ सालापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला. बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नी व माता यांच्यासाठी वानवडी येथे वीरस्मृती ही वसाहत आहे. आज याच वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबाच्या त्यागामुळे तिरंगा आकाशात फडकत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत दरवर्षी भाऊबीज साजरी केले जाते. यंदा २६ वीरपत्नींसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.


