Click or tap here to enter text.
~ नवे प्रेम, जुनी भांडणे आणि पुन्हा एकदा कॉलेजमधील धम्माल! ‘कॅम्पस डायरीज सीझन 2’ 18 नोव्हेंबर 2026 पासून फक्त प्राइम व्हिडिओवर मोफत स्ट्रीम होणार ~
मुंबई, भारत – 13 नोव्हेंबर 2026 : एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल कंटेन्टसाठी भारतातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा असलेल्या प्राइम व्हिडिओने आज ‘कॅम्पस डायरीज सीझन 2’ या आगामी एमएक्स ओरिजिनल सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. अभिषेक यादव दिग्दर्शित या सीरिजची निर्मिती प्रेम मिस्त्री आणि अभिषेक यादव यांनी केली आहे. या सीरिजमध्ये हर्ष बेनिवाल, ऋत्विक साहोरे, सलोनी गौर, सृष्टी गांगुली, सलोनी पटेल आणि अभिनव शर्मा या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा कॉलेजच्या विश्वात घेऊन जाण्यात येणार आहे. या ठिकाणी मैत्रीची कसोटी लागते आणि नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे होतात. ‘कॉलेज शोज का बाप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये भावनिक चढउतार, अनपेक्षित संघर्ष आणि कॉलेजमधील धमाल पाहायला मिळणार आहे. यलो मॉन्टाज या बॅनरअंतर्गत ‘कॅम्पस डायरीज सीझन 2’ची निर्मिती करण्यात आली आहे.
पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर कॉलेज जीवनावर आधारित एक उत्कृष्ट सीरिज म्हणून ‘कॅम्पस डायरीज सीझन 2’ आपले स्थान अधिक भक्कम करण्यास सज्ज आहे. कॉलेज जीवनावर आधारित इतर सीरिजपेक्षा ही सीरिज वेगळी ठरते, कारण आजच्या तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांचे वास्तववादी चित्रण यात करण्यात आले आहे. मैत्री, पहिले प्रेम, स्वतःच्या क्षमतांबद्दल वाटणारी शंका आणि मोठे होत असताना येणारा दबाव अशा तरुणांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर या सीरिजमध्ये कोणताही आडपडदा न ठेवता प्रकाश टाकण्यात आला आहे. आजच्या तरुणांसमोरील खऱ्या आव्हानांचे चित्रण यात करण्यात आले असून पडद्यावर आपल्याच आयुष्यातील प्रसंग पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकांना ही कथा अधिक जवळची वाटते.
ट्रेलरच्या सुरुवातीला मित्रांचा ग्रुप पुन्हा एकदा कॉलेजमध्ये एकत्र आल्याचे पाहायला मिळते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहही दिसून येतो. मात्र, आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि त्यांच्यातील नातेसंबंधही पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. अभिलाष आणि सुश्मिता यांच्यातील नात्याला नवे वळण मिळते, सान्या आणि राघव एकमेकांच्या अधिक जवळ येतात, तर सुधीर आणि प्रियंका यांच्या नात्यातही काही रंजक घडामोडी घडतात. प्रेमभंग, मतभेद आणि अनपेक्षित प्रसंगांमुळे एकेकाळी अगदी सहज असलेल्या त्यांच्या मैत्रीची नव्याने कसोटी लागते. कॉलेज फेस्टची तयारी, मित्रांमधील गमतीजमती आणि बदलते नातेसंबंध या सगळ्या घडामोडींमध्ये हा मित्रांचा ग्रुप यावेळी तरी एकत्र राहू शकेल का, हा प्रश्न निर्माण होतो.
या सीरिजबद्दल प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक आणि एव्हीओडी कंटेन्ट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, “आमच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या कॉलेज ड्रामापैकी एक असलेली ही सीरिज पुन्हा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी कथा, लोकप्रिय कलाकार आणि लक्षवेधी व्यक्तिरेखा ही या सीरिजची वैशिष्ट्ये आहेत. मैत्री, नातेसंबंध आणि तरुणांच्या आकांक्षा यांचे चित्रण यात करण्यात आले असून प्रेक्षकांना या गोष्टी आपल्या आयुष्याशी संबंधित वाटतात. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना ही सीरिज भावली असल्यामुळे ती अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. आता पुन्हा एकदा ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
सुधीरची भूमिका पुन्हा साकारण्याच्या अनुभवाबद्दल हर्ष बेनिवाल म्हणाला, “प्रेक्षकांना अत्यंत जवळची वाटणारी व्यक्तिरेखा पुन्हा साकारण्याची आणि त्या विश्वात परतण्याची संधी मिळणे हा खूप उत्साहवर्धक अनुभव आहे. ‘कॅम्पस डायरीज सीझन 2’मध्ये सुधीरच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतात. त्याला आपल्या जबाबदाऱ्या, मैत्री आणि प्रियंकाबद्दलच्या भावना या सगळ्यांचा मेळ घालावा लागतो. या प्रवासात विनोदी प्रसंग आहेत, भावनिक क्षण आहेत आणि भरपूर गोंधळही आहे. त्यामुळे सुधीरच्या व्यक्तिरेखेचे नवे पैलू साकारणे माझ्यासाठी विशेष रंजक ठरले. सर्व कलाकारांसोबत पुन्हा एकत्र काम करताना कॉलेजमध्ये परतल्यासारखे वाटले. ही सीरिज तयार करताना आम्ही जितकी धमाल केली, तितकीच धमाल प्रेक्षकांनाही ती पाहताना अनुभवायला मिळेल, अशी मला आशा आहे.”
अभिलाषची भूमिका साकारणारा ऋत्विक साहोरे म्हणाला, “या सीझनमध्ये अभिलाषच्या आयुष्यातील नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे होतात. आपण घेतलेल्या निर्णयांचे काय परिणाम होऊ शकतात, हेही त्याच्या कथेतून पाहायला मिळते. अभिलाषच्या स्वभावातील उणिवा, त्याची भावनिक असुरक्षितता आणि त्याच्या वागण्याचा आजूबाजूच्या लोकांवर होणारा परिणाम तो कशा प्रकारे हाताळतो, हे साकारणे मला विशेष रंजक वाटले. नव्या सीझनमध्ये अनेक अनपेक्षित वळणे आहेत. सर्व कलाकारांसोबत पुन्हा एकत्र येऊन या विश्वात काम करण्याचा अनुभवही खूप आनंददायी होता. या व्यक्तिरेखांनी घेतलेले निर्णय प्रेक्षकांना प्रत्येक वेळी पटतीलच असे नाही. मात्र, त्यांचा प्रवास प्रेक्षकांना आपलासा वाटेल, अशी मला आशा आहे. ‘कॅम्पस डायरीज सीझन 2’मधील धमाल आणि या नव्या सीझनमध्ये काय काय घडणार आहे, हे प्रेक्षकांनी अनुभवावे, यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
सान्याची भूमिका साकारणारी सृष्टी गांगुली म्हणाली, “सान्या ही आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल असलेली आणि समोर येणाऱ्या प्रत्येक नव्या गोष्टीचा अनुभव घेण्यास उत्सुक असलेली मुलगी आहे. मात्र, या सीझनमध्ये तिला नव्या भावना आणि नातेसंबंधांना सामोरे जावे लागते. त्यातून तिच्यासमोर अनपेक्षित आव्हाने उभी राहतात. सान्याच्या स्वभावातील विविध पैलू आणि तिच्या अनुभवांचा तिच्या निर्णयांवर कसा परिणाम होतो, हे साकारणे मला सर्वाधिक आवडले. कॉलेज जीवनातील धमाल, उत्स्फूर्तपणा आणि गोंधळ यांच्यासोबतच भावनिक असुरक्षिततेचे क्षण आणि व्यक्तिरेखांमध्ये होत जाणारे भावनिक बदल यांचे सुंदर चित्रण या सीझनमध्ये करण्यात आले आहे. सान्या आणि तिच्या मित्रांच्या आयुष्यातील या नव्या पर्वाचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडले जातील, अशी मला आशा आहे.”
‘कॅम्पस डायरीज सीझन 2’ ही एमएक्स ओरिजिनल सीरिज 18 नोव्हेंबर 2026 पासून प्राइम व्हिडिओ आणि एमएक्स प्लेअरच्या अँड्रॉइड ॲपवर मोफत स्ट्रीम होणार आहे. एमएक्स प्लेअर हे ॲप आता ‘एमएक्स प्लेअर बाय प्राइम व्हिडिओ’ या नव्या नावाने आणि नव्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. भारताची आघाडीची मोफत, प्रीमियम आणि जाहिरात-आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असलेले हे ॲप मोबाइल, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओ टीव्ही आणि
एअरटेल एक्सस्ट्रीमवर उपलब्ध आहे.


