पुणे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देऊन शेतीची कामे अधिक सुलभ व कमी खर्चात करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ हजार ७९५ शेतकऱ्यांना ६५ कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८८९ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी, ३६४ शेतकऱ्यांना पॉवर टिलरसाठी, २ हजार ९०२ शेतकऱ्यांना कृषी यंत्र-अवजारांसाठी, ६०० शेतकऱ्यांना कृषी अवजारे बँकेसाठी, १३ शेतकऱ्यांना किसान ड्रोनसाठी, तर २७ शेतकऱ्यांना कंबाईन हार्वेस्टरसाठी अनुदान देण्यात आले आहे.
ट्रॅक्टर व पॉवर टिलरच्या वापरामुळे शेतीची कामे सुलभ होण्यासोबतच मजुरीवरील खर्च कमी होण्यास मदत होत आहे. पॉवर टिलरचा उपयोग उसाची बांधणी, फळबागांमध्ये भर लावणे, तणनियंत्रण व मशागतीसाठी होतो. तसेच ट्रॅक्टरचलित कल्टिव्हेटर, नांगर, ब्लोअर, ट्रॉली, चाफ कटर, ऊस पाचट व्यवस्थापन यंत्र, बेलर मशीन, शुगरकेन श्रेडर-कटर, पेंडी थ्रेशर, फवारणी व पेरणी यंत्रांसाठीही अनुदान दिले जाते.
कृषी अवजारे बँक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० ते २५ लाख रुपयांपर्यंतची ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करता येतात. त्यासाठी ४ ते १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. चालू वर्षात ६०० कृषी अवजारे बँकांना एकूण २४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
किसान ड्रोन योजनेतून १३ शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ५७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ड्रोनच्या माध्यमातून ऊस, इतर पिके आणि फळबागांवर फवारणी करता येते. तसेच दुष्काळी परिस्थितीत पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी युरिया व पोटॅशची फवारणी करण्यास ड्रोन उपयुक्त ठरतो. कंबाईन हार्वेस्टरचा उपयोग गहू, हरभरा, सोयाबीन, मका आदी पिकांच्या काढणीसाठी होतो.
कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतीतील श्रम, वेळ आणि उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000


