Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाय ईव्ही सर्व्हिसचे पुण्यात पहिले मल्टी-ब्रँड ईव्ही सर्व्हिस हब सुरू; सहा महिन्यांच्या...

माय ईव्ही सर्व्हिसचे पुण्यात पहिले मल्टी-ब्रँड ईव्ही सर्व्हिस हब सुरू; सहा महिन्यांच्या प्रायोगिक टप्प्याला सुरुवात

पुणे, १८ नोव्हेंबर २०२६: पुण्यातील इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनधारकांसाठी आता स्वतंत्र बहु-कंपनी सेवा केंद्र उपलब्ध झाले आहे. ऑटोबॉट ई-मोबिलिटी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माय ईव्ही सर्व्हिस या ब्रँडअंतर्गत कंपनीने आपले पहिले कंपनीद्वारे संचालित ईव्ही सर्व्हिस हब, पांडुरंग ईव्ही सर्व्हिस हब, ज्योतिबा नगर, तळवडे, पिंपरी-चिंचवड येथे सुरू केले. भोसरी, पिंपरी-चिंचवडचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

या केंद्रात आजपासून दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणारे नागरिक, वितरण सेवांमध्ये कार्यरत वाहनचालक आणि रिक्षाचालक आपल्या वाहनांची तांत्रिक तपासणी, नियमित देखभाल आणि दुरुस्ती करून घेऊ शकतील. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक वाहनाची अनिवार्य तांत्रिक तपासणी केली जाईल. त्यानंतर ग्राहकांना करावयाच्या कामांचा आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशीलवार अंदाज दिला जाईल. सशुल्क काम ग्राहकांच्या मंजुरीनंतरच सुरू केले जाईल. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहनाची गुणवत्ता तपासणी केली जाईल आणि ग्राहकांना बिलासह डिजिटल सेवा नोंद दिली जाईल. हे ईव्ही सर्व्हिस हब आठवड्यातील सहा दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहील. गुरुवारी ईव्ही सर्व्हिस हब बंद असेल. सेवा बुकिंग केवळ माय ईव्ही सर्व्हिस ॲप किंवा कंपनीच्या myevservice.in या संकेतस्थळावरून करता येईल.

 

पांडुरंग ईव्ही सर्व्हिस हब हे माय ईव्ही सर्व्हिसच्या तीन प्रकारच्या कार्यशाळांपैकी सर्वांत मोठे केंद्र आहे. विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची दुरुस्ती व देखभाल, अधिक गुंतागुंतीच्या तांत्रिक समस्यांचे निदान आणि तंत्रज्ञांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. इतर प्रकारच्या वाहनांसाठीही टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्यात येणार आहे. ईव्ही प्रणाली आणि विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ येथे कार्यरत असतील. वाहन स्वीकारण्यापासून अंतिम गुणवत्ता तपासणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी आठ टप्प्यांची प्रमाणित कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे.

 

या केंद्राच्या उद्घाटनासह पुण्यात सहा महिन्यांच्या प्रायोगिक कार्यप्रणालीला सुरुवात झाली आहे. या कालावधीत ग्राहकांना सेवा किती सहज उपलब्ध होते, वाहन दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी, दुरुस्तीचा दर्जा, सुटे भागांची उपलब्धता आणि सेवेची आर्थिक व्यवहार्यता या बाबींचे मूल्यमापन केले जाणार आहे. या अनुभवाच्या आधारे देशभरातील नवीन सेवा केंद्रांसाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित केली जाईल.

 

माय ईव्ही सर्व्हिसची सेवा प्रणाली चार प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे: अचूक निदान, शक्य असेल तेथे दुरुस्तीला प्राधान्य, प्रमाणित सेवा प्रक्रिया आणि पारदर्शक ग्राहक सेवा. कोणताही सुटा भाग बदलण्याची शिफारस करण्यापूर्वी तंत्रज्ञ वाहनातील बिघाडाचे नेमके कारण शोधतात. तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि सुरक्षित असल्यास भाग बदलण्याऐवजी त्याची दुरुस्ती केली जाते. विशेषतः वाहनाची हमी संपल्यानंतर अनावश्यक सुटे भाग बदलण्याचा खर्च टाळण्यास या पद्धतीची मदत होईल.

 

या सेवा केंद्राचे कामकाज कंपनीने विकसित केलेल्या ऑटोबॉट ओएस या स्वमालकीच्या तंत्रज्ञान मंचावर चालते. ग्राहकांच्या नोंदणीपासून डिजिटल कार्यपत्रिका, तंत्रज्ञांच्या कामाचे व्यवस्थापन, सुट्या भागांचे समन्वयन आणि देयक प्रक्रियेपर्यंतच्या सर्व बाबी एकाच प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत. माय ईव्ही सर्व्हिस ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा केंद्र शोधणे, सेवेची नोंदणी करणे आणि आपल्या वाहनाच्या दुरुस्ती व देखभालीचा पूर्वइतिहास पाहणे शक्य होईल. याशिवाय, सेवा केंद्रांचे स्थान निश्चित करण्यासाठी मंचामध्ये भौगोलिक मर्यादा निश्चित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आपत्कालीन सेवा किंवा रस्त्यात वाहन बंद पडल्यास मदत मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्य प्रणालीही विकसित केली जात आहे.

 

माय ईव्ही सर्व्हिसने मार्च २०२७ पर्यंत देशभरात ३० सेवा केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुण्यात डिसेंबर २०२६ पर्यंत पाच केंद्रे कार्यान्वित करण्याची योजना आहे. यामध्ये पुण्यातील बावधन येथील कंपनीच्या मालकीचे आणि कंपनीमार्फत चालवले जाणारे (सीओसीओ) केंद्र, तर उर्वरित केंद्रे फ्रँचायझीच्या मालकीची आणि कंपनीमार्फत संचालित (एफओसीओ) असतील. पुण्यातील प्रारूपाच्या आधारे मार्च २०२७ अखेरपर्यंत देशातील विविध शहरांमध्ये आणखी २५ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर असलेल्या शहरांना प्राधान्य दिले जाईल.

 

बंगळुरू हे कंपनीचे पुढील महत्त्वाचे लक्ष्य असून, तेथे तीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय म्हैसूर, हैदराबाद, कोईम्बतूर, केरळ, एनसीआर, मध्य प्रदेशातील इंदूर आणि विदिशा, बिहारमधील भागलपूर, तसेच महाराष्ट्रातील नागपूर (दोन केंद्रे), नाशिक (दोन केंद्रे) आणि सिंधुदुर्ग (एक केंद्र) येथेही सेवा नेटवर्कचा विस्तार केला जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, देशभरातील विविध शहरांतून फ्रँचायझीसाठी २०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, पुण्यातील चार फ्रँचायझी भागीदार निश्चित करण्यात आले आहेत.

 

या सेवा नेटवर्कला आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कंपनीच्या ऑटोबॉट ॲकॅडमी या पूरक उपक्रमाद्वारे इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेल्या तंत्रज्ञांची फळीही तयार केली जात आहे.

 

सेवा नोंदणीसाठी: ग्राहक माय ईव्ही सर्व्हिस ॲपचा वापर करू शकतात किंवा myevservice.in या संकेतस्थळा

ला भेट देऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments