Pune | 19 नोव्हेंबर 2026 – देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. या क्षेत्रात ९.९० कोटींहून अधिक सूक्ष्म उद्योग सक्रीय आहेत. नोंदणीकृत एमएसएमई उद्योगांमध्ये या सूक्ष्म उद्योगांचा वाटा ९९ टक्क्यांहून जास्त दिसून आला आहे.
आकडेवारीनुसार, एमएसएमई क्षेत्रात ४४ कोटींहून अधिक रोजगारनिर्मिती झाली असल्याची नोंद आहे. देशात कृषी क्षेत्राखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून एमएसएमई क्षेत्राकडे पाहिले जाते. देशाच्या आर्थिक प्रगतीत आणि रोजगार निर्मितीत या उद्योगांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण आणि तळागाळातील उद्योगांची ही ताकद लक्षात घेऊन, भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मदतीने व्यवसाय करणा-या देशभरातील १४ ‘ग्रामप्रेन्युअर्स’ उद्योजकांची ‘जेआरडी टाटा अवॉर्ड्स २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये पाच महिला उद्योजकांचाही समावेश आहे. नवी दिल्ली येथे भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्यावतीने आज या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवून या गुणी उद्योजकांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश राज्याचे राज्यसभा खासदार विजय चिंताकायाला आणि पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
१९९५ साली बीवायएसटीने संस्थापक अध्यक्ष आणि भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जेआरडी टाटा अवॉर्ड्स पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. यशस्वी व्यवसाय उभारणा-या, रोजगार निर्माण करणा-या आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देणा-या तरुण उद्योजकांचा सन्मान करणे , हा यामागील उद्देश आहे. ‘सेलिब्रेशन ग्रामप्रेन्युअर्स® ग्रोविंग इंडिया’ या संकल्पनेनुसार, उद्योजकीय उत्कृष्टतेसाठी तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले गेले. यामध्ये ‘एन्ट्रप्रिनअर ऑफ द इयर २०२६’, ‘वुमन एन्ट्रप्रिनर ऑफ द इयर २०२६’ आणि ‘फास्टेस्ट ग्रोइंद एन्ट्रप्रिनर ऑफ द इयर २०२६’ यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,“देशाच्या आर्थिक विकासातून विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला हव्यात. तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कल्पना आणि सहज वित्तपुरवठ्याच्या मदतीने सूक्ष्म व लघु उद्योगांना बळकटी दिल्यास उत्पादन वाढवण्यास मदत होते. याशिवाय कच-यातून संपत्ती निर्माण करणे, स्थानिक पातळीवर रोजगार देणे आणि प्रादेशिक उत्पन्न विषमता दूर करणे शक्य होते. अनुभवी मार्गदर्शकांच्या मदतीने तळागाळातील उद्योजकता आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योजकता व्यवस्था उभारू शकते आणि आत्मनिर्भर व विकसित भारताच्या स्वप्नात मोठे योगदान देऊ शकते.”
“सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देणे, रोजगार निर्माण करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे यामध्ये सूक्ष्म व लघु उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात. तळागाळातील उद्योजकांचा सन्मान करणे केवळ त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी नव्हे तर नावीन्यपूर्ण उपक्रम, उद्योजकता आणि स्वावलंबनाची संस्कृती वाढवण्यासाठीही आवश्यक आहे. वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि योग्य मार्गदर्शनाच्या मदतीने पहिल्या पिढीतील उद्योजक आपला व्यवसाय वाढवू शकतात. यातून ते शाश्वत उपजीविका निर्माण करून विकसित भारताच्या स्वप्नात मोलाचे योगदान देऊ शकतात. बीवायएसटीच्या मार्गदर्शनावर आधारित उपक्रमांमधून तळागाळातील उद्योजकीय क्षमता घडवण्याचे महत्त्व दिसून येते.” असे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव यांनी नमूद केले.
“आम्ही संपूर्ण देशभरात सूक्ष्म उद्योजकांनी छोट्या कर्जाच्या मदतीने यशस्वी उद्योग उभारल्याचे पाहिले आहे. या सूक्ष्म उद्योजकांनी आपल्या सुरुवातीच्या गुंतवणूकीतून शेकडो किंवा हजारो पटीने मोठे व्यवसाय उभे केले आहेत. त्यांचे यश केवळ कर्जाची परतफेड किंवा उलाढालीच्या आकड्यांपुरते मर्यादित नाही. ते रोजगार निर्माण करतात, पर्यावरण आणि कामगारांशी संबंधित जबाबदार नियमांचे पालन करतात आणि आपल्या समाजाची सामाजिक व आर्थिक घडी मजबूत करतात. केवळ कर्ज मिळाल्याने उद्योग टिकून राहू शकत नाहीत, वाढू शकत नाहीत किंवा रोजगार निर्माण करू शकत नाहीत. त्यांना वित्तपुरवठ्यासोबतच सातत्यपूर्ण मार्गदर्शन, बाजारपेठेची उपलब्धता, क्षमता बांधणी आणि संस्थात्मक पाठबळाची गरज असते. देशाच्या आर्थिक विकासाचे रुपांतर हे दरवेळी खेडापाड्यात किंवा छोट्या शहरांतील समृद्धी, वाढीव उत्पन्न आणि रोजगाराच्या संधींमध्ये होईलच असे नाही. आपल्याला केवळ वरवरच्या विकास निर्देशांकांच्या पलीकडे जाऊन पाहावे लागेल. जे.आर.डी.टाटा यांची हीच विचारसरणी होती. सक्षम स्थानिक अर्थव्यवस्था उभारण्याठी लघु उद्योगांना बळ देणे आणि त्यांच्या यशातून इतरांना प्रेरणा देणे यावर त्यांचा विश्वास होता.”,असे बीवायएसटीच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय विश्वसत लक्ष्मी वेंकटरमण वेंकटेशन म्हणाल्या.
चेन्नई रेडहिल्स येथील ‘मेमर्स हाफा फूड्स एण्ड फ्रोझन फूड्स’ आणि ‘हाफा फ्रोझन फूड्स इंटरनॅशनल प्रा.लि.’चे संस्थापक श्री. जे. हाजा फुण्यामीन यांना ‘आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. के. व्ही. नागभूषण यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. रस्त्यावरील एका सामान्य समोसा विक्रेत्यापासून सुरू झालला त्यांचा प्रवास आज १५.५८ कोटी रूपयांचा फ्रोझन-फूड उद्योगापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या यशस्वी व्यवसायाची उत्पादने आज संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आणि श्रीलंका या देशांमध्ये निर्यात केली जातात. या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी १०० हून अधिक लोकांना थेट रोजगार दिला आहे. तसेच, ४५० हून अधिक कुटुंबांना प्रत्यक्ष उपजीवीकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या जिद्दीचा आणि व्यावसायिक यशाचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सौ. सुजाता मनोज गणागे आणि सौ. माधवी चंद्रशेखर गिरणाळे यांना ‘वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. सुजाता मनोज गणागे यांनी ‘एस.एम. इंजिनिअरिंग’ ही कंपनी उभारली आहे. रियायकलिंग मशिनरी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुटे भाग तयार करण्यात या कंपनीने विशेष प्रावीण्य उभारले आहे. त्यांना डॉ. दिलीप वैरागडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सौ. माधवी चंद्रशेखर गिरणाळे यांनी ‘गिरणाळे प्रोग्रामिग सोल्युशन’ची स्थापना केली आहे. ही कंपनी प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात डाय आणि मोल्ड्सच्या सीएनसी मशीनिंगसाठी ओळखली जाते. त्यांना डॉ. अनिल कौसडीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय यश आणि मोलाचे योगदान लक्षात घेता, त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मायक्रोटेक पॉलिमर्सचे श्री रुपेश हनुमंत शिवरकर यांना ‘फास्टेस्ट ग्रोइंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना श्री. सौमित्र घोटीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या व्यवसायाने गेल्या काही वर्षांत विकासाची कास धरली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल १.५६ कोटी रुपये होती. २०२३-२४ साली ही उलाढाल ६५ टक्क्यांनी वाढली. या आर्थिक वर्षांत २.५७ कोटीपर्यंत उत्पन्न नोंदवले गेले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात (तात्पुरत्या आकडेवारीनुसार) ही उलाढाल ११६ टक्क्यांच्या वाढीसह थेट ५.५७ कोटींपर्यंत दिसून आली. या आर्थिक प्रगतीसोबतच त्यांनी प्रिसिजन इंजेक्शन-मोल्डेड प्लास्टीक घटकांचा व्यवसायाचा विस्तार केला आहे. तसेच, आज त्यांची उत्पादने सातहून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार विजेत्यांव्यतिरिक्त, अंतिम फेरीसाठी निवडलेले इतर ग्रामप्रेन्युअर्स विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, अन्न प्रक्रिया, कृषी व्यवसाय, शेती तंत्रज्ञान, रिसायकलिंग आणि औद्योगिक सोल्युशन्स या क्षेत्रांचा समावेश आहे. यातील अनेकांनी औपचारिक आर्थिक मदत मिळवण्यातील अडचणींवर मात केली आहे. बायस्टच्या सक्रिय पाठिंब्याने यशस्वी उद्योग उभारले आहेत. हे उद्योजक आज मोठ्या कंपन्यांना मालाचा पुरवठा करत आहेत. तसेच, त्यांनी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या असून, काही उद्योजक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सेवा देत आहेत.
‘जेआरडी टाटा अवॉडर्स २०२६’ या कार्यक्रमामुळे संस्थात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी तसेच सामूहिक उपक्रमांद्वारे उद्योजकतेला चालना देण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या परिषदेचा भाग म्हणून बायस्टने शिक्षण, सरकार, सामाजिक संस्था आणि कौशल्य विकास क्षेत्रातील विविध संस्थांसोबत सहा सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यात बीएमएल मुंजाल युनिव्हर्सिटी-इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन एण्ड आंत्रप्रेन्योरशिप (आयटूई), नॅब इंडिया सेंटर फॉर ब्लाइंड वुमन एण्ड डिसॅबिलिटी स्टडीज (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड), स्किल्स डेव्हलपमेंट नेटवर्क (एसडीएन) व वाधवानी फाऊंडेशन, सिम्बोयसिस सेंटर फॉर आंत्रप्रेन्योरशिप एण्ड इनोव्हेशन-टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर(एससीईआय-टीबीआय), शारदा युनिव्हर्सिटी आणि राज्य सरकारची स्वायत्त संस्था अमृत-अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट एण्ड ट्रेनिंग यांचा समावेश आहे. संस्थात्मक सहकार्य, मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवोदित उद्योजकांना व्यापक पाठवळ देऊन उद्योजकला विकासाला बळकटी देणे हा भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्यानिमित्ताने धोरणकर्ते, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ, मार्गदर्शक हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आले. भारतीय अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म उद्योगांच्या भूमिकेवर चर्चा करणे, हा यामागील उद्देश होता. या कार्यक्रमातील विविध सत्रांमध्ये महिला उद्योजकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि बाजारपेठेची उपलब्धता या महत्त्वाच्या विषयावर भर दिला गेला. सूक्ष्म उद्योगांचे शाश्वत आणि मोठ्या व्यवसायांमध्ये कसे रुपांतर करता येईल. यावरही चर्चा करण्यात आली.
संस्थात्मक मार्गदर्शक, उद्योजक, सरकार आणि उद्योग क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून नवीन उद्योगांच्या निर्मितीला चालना देणे, उद्योजकांन आर्थिक मदत मिळवून देणे आणि मोठ्य प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यावेळी, ग्रामप्रेन्युअर्स® या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तळागाळातील उद्योजकांचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांचे उल्लेखनीय योगदान जगासमोर आणणे व त्याचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
पुरस्कारांच्या नऊ सदस्यीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रा. एस. महेंद्र देव यांनी सांभाळली. प्रा. देव हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. हिरो एंटरप्राइजचे अध्यक्ष श्री. सुनील कांत मुंजाळ यांनी या मंडळाचे सह-अध्यक्षपद भूषवले. परीक्षक मंडळाने उद्योजकांचे काटेकोर मूल्यमापन केले. व्यवसायाची वाढ, नफा आणि कर्जाची परतफेड या निकषांवर पुरस्कार विजेत्यांची निवड केली गेली. या मूल्यमापनानंतर सर्व विजेत्यांची एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात आला. हे मार्गदर्शक वैयक्तिक व्यवसाय मार्गदर्शन करतात. ही मार्गदर्शक पद्धत जुन्या ‘गुरू-शिष्य परंपरेवर’ आधारित आहे. संस्थात्मक वित्त मिळवण्याबाबत आणि शाश्वत व्यवसाय उभारण्यात ही पद्धत बायस्टला मदत करते.
१९९२ साली बायस्टची स्थापना झाली. कंपनीने स्थापनाकाळापासूनच ७२ हजारांहून अधिक उद्योजकांना पाठबळ दिले आहे. या माध्यमातून पहिल्या पिढीतील उद्योजकांना व्यवसाय उभारण्यास मदत होत रोजगारनिर्मितीस हातभार लागला आहे. तसेच स्थानिक आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.


