पुणे, दि. २० (जिमाका वृत्तसेवा) : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ येथे १ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी विजयस्तंभास भेट देऊन आपल्या पूर्वजांना मानवंदना दिल्याच्या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून विविध सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी केली. अनुयायांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वाहनतळ, बुक स्टॉल, हिरकणी कक्ष, निवारा कक्ष, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, रक्तसंकलन केंद्र, प्रसारमाध्यमांसाठी व्यासपीठ, नियंत्रण कक्ष तसेच मानवंदना कार्यक्रमाच्या निवेदनासाठीच्या व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
या पाहणीवेळी हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील, पीएमपीएमएलचे प्रतिनिधी यशवंत हिगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल राठोड, डॉ. आयेश फातेमा, रामदास लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शताब्दी वर्षाचे औचित्य आणि अपेक्षित गर्दी विचारात घेऊन अनुयायांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे. बार्टीच्या माध्यमातून संबंधित सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन करण्यात येत आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच हा सोहळा शांततेत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.


