Saturday, November 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे तर ६ हजार एकर...

*पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा*

 

 

*ज्वारीचे १० हजार व हरभराचे २ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे मिनीकिट वाटप करण्यात येणार*

 

 

पुणे, दि.२१: पुणे जिल्ह्यात कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३ तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियान योजनेअंतर्गत ज्वारी पिकाच्या फुले यशोमती या वाणाचे १९ हजार ७५५ एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे वाटप करण्यात आलेल्या बहुतांश ठिकाणी पेरणी पूर्ण झाली आहे.

 

चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे रब्बी हंगामात विहिरी, कॅनॉल, तलाव बोअरवेल या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकते अशा ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणी केल्यानंतर त्यास २ ते ३ संरक्षित पाणी मिळाले तर ज्वारीचे धान्याचे उत्पादन होईल तसेच जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात कडबा उपलब्ध होईल, यामुळे चारा टंचाईचा प्रश्न देखील निकाली निघू शकतो.

 

शेतकऱ्यांना अजून १० हजार एकर क्षेत्रावर मोफत बियाणाचा पुरवठा करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून सुरू असून, सदर बियाणे येत्या २ ते ३ दिवसात शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांना ज्वारी पिकाची पेरणी करायची आहे अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

 

रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात हरभरा हे प्रमुख पीक आहे. हरभरा पिकास कमी प्रमाणात पाणी लागते. २ ते ३ वेळेस पाणी दिल्यास हरभरा पीकाचे उत्पादन चांगले येते

व जमिनीचा पोत देखील सुधारतो. हरभरा कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पिकास चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पसंती आहे . ज्या ठिकाणी ऊस तुटून जात आहे व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू शकते अशा ठिकाणी उसाचा खोडवा न राखता हरभरा पीक केल्यास, पीक फेरपालट होऊन बेवडदेखील होतो व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच पुढील पीक चांगल्या प्रमाणात घेता येते.याकरिता चालू रब्बी हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात जवळपास ६ हजार ३२० एकर क्षेत्रासाठी हरभराचे मोफत बियाणे वाटप केले आहे. तसेच यापुढे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरभरा बियाणाचे महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे या घटकासाठी अर्ज न करता मिनीकिट या घटकासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments