– ‘ऑलकार्गो समूह’ आणि ‘फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी’ यांच्यात सामंजस्य करार; 15 कोटी रुपयांचे योगदान
पुणे, प्रतिनिधी
वंचित आणि ग्रामीण भागातील तरुणांना लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी क्षेत्रात करिअरच्या जागतिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऑलकार्गो समूहा’ने पुढाकार घेतला आहे. समूहाच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या ‘अवश्य फाउंडेशन’च्या माध्यमातून पुण्यातील ‘फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी’सोबत (एफएसयू) एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये ‘ऑलकार्गो स्कूल ऑफ लॉजिस्टिक्स’ची स्थापना करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या कौशल्य विकास मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ऑलकार्गो समूहाने या संस्थेच्या उभारणीसाठी 15 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या उपक्रमांतर्गत 100 पात्र विद्यार्थ्यांना ‘लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन’ या विषयातील दोन वर्षांचा पूर्णतः विनामूल्य एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी 50 मुलांना आणि दुसऱ्या वर्षी 50 मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गुणवत्ता-नि-आर्थिक गरज (मेरिट-कम-मीन्स) शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील तसेच कुटुंबातून पहिल्यांदाच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी ‘एनएसई सोशल स्टॉक एक्सचेंज’वरील फ्युएलच्या दुसऱ्या इश्यूसोबत या संस्थेचा औपचारिक शुभारंभ होणार आहे.
याप्रसंगी बोलताना ऑलकार्गो समूहाचे अध्यक्ष व संस्थापक आणि आयआयएम मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी म्हणाले की, “भारताच्या आर्थिक विकासात लॉजिस्टिक्स क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, ग्रामीण आणि वंचित घटकांतील अनेक तरुणांसाठी दर्जेदार शिक्षण व कौशल्यांचा अभाव हा या क्षेत्रात येण्यातील मोठा अडथळा ठरतो. ‘ऑलकार्गो स्कूल ऑफ लॉजिस्टिक्स’च्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची संधी न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राशी सुसंगत ज्ञान देऊन ही दरी भरून काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. संधी मिळाल्यास माणसाचे आयुष्य बदलू शकते, यावर माझा ठाम विश्वास आहे.”
फ्युएलचे अध्यक्ष आणि ‘फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी’चे संस्थापक कुलगुरू डॉ. केतन देशपांडे म्हणाले की, “आमच्या स्कूल ऑफ लॉजिस्टिक्सला नाव देऊन त्याला भक्कम आधार दिल्याबद्दल आम्ही शशी किरण शेट्टी, आदर्श हेगडे आणि ऑलकार्गो समूहाचे मनापासून आभारी आहोत. हे केवळ आर्थिक अनुदान नसून, एका मार्गदर्शकाचा आमच्या विद्यार्थ्यांवर असलेला हा विश्वास आहे. उद्योग संस्था आणि कंपन्यांच्या सहकार्याने शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमांद्वारे आम्ही एक प्रकल्प-आधारित आणि उद्योग-सुसंगत संस्था उभारू, जी कुटुंबातून पहिल्यांदाच शिकणाऱ्या तरुणांना लॉजिस्टिक्स क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवून देईल.”


