Sunday, November 22, 2026
Google search engine
HomeUncategorized‘भक्ती त्रिवेणी’ ने नृत्याविष्कारातून घडविला भक्तीचा प्रवास

‘भक्ती त्रिवेणी’ ने नृत्याविष्कारातून घडविला भक्तीचा प्रवास

 

 

 

पुणे, २१ नोव्हेंबर २०२६: अदिती मेंदिरत्ता आणि तनया बाजीकर यांनी ‘भक्ती त्रिवेणी – कैलास, वृंदावन आणि अयोध्येचा नृत्यमय प्रवास’ हा भरतनाट्यम नृत्याविष्कार शनिवारी चिंचवड येथील एलप्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या सभागृहात सादर केला. कैलास, वृंदावन आणि अयोध्या या तीन आध्यात्मिक स्थळांचे महत्त्व आणि त्यांच्याशी जोडलेल्या भक्तीभावाचे विविध पैलू या सादरीकरणातून उलगडण्यात आले.

 

ब्लॉसम डान्स अकॅडमीच्या संचालिका आणि गुरू श्रीमती मौसम पारेख मेहता यांच्या शिष्या असलेल्या अदिती आणि तनया यांनी भारतीय पौराणिक कथा आणि भक्तीपरंपरेतील विविध भाव पारंपरिक भरतनाट्यम रचनांमधून सादर केले. भगवान शंकराशी संबंधित कैलास, भगवान श्रीकृष्णाशी संबंधित वृंदावन आणि प्रभू श्रीरामाशी संबंधित अयोध्या अशा तीन संकल्पनांची गुंफण या नृत्याविष्कारात करण्यात आली होती.

 

कार्यक्रमात पुष्पांजली, अलारिप्पू, जतिस्वरम, सरस्वती कौतुकम्, वर्णम्, कीर्तनम्, पदम् आणि तिल्लाना अशा पारंपरिक भरतनाट्यम रचना सादर करण्यात आल्या. तालबद्ध नृत्याविष्कार, भावमुद्रा आणि कथाकथनाच्या माध्यमातून कलाकारांनी भक्तीचे विविध भाव प्रभावीपणे व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू प्रा. उमाकांत दाश आणि उगाओ अ‍ॅग्रीटेक प्रा. लि.चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धांत भालिंगे उपस्थित होते. तसेच ‘कलागुरु मोक्ष स्कूल ऑफ डान्स’ च्या सौ.अंजली बागल यांची विशेष उपस्थिती होती.

 

या नृत्याविष्काराला श्रीमती मौसम पारेख मेहता यांनी नट्टुवांगम, श्री शिव प्रसाद एन. एन. यांनी गायन, श्री सुरेश सेतुमाधवन यांनी मृदंगम, श्री नारायण रमण यांनी व्हायोलिन आणि श्री संजय ससीधरन यांनी बासरीची साथ दिली.

 

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांच्या प्रशिक्षण आणि सरावातून घडलेल्या अदिती आणि तनया यांच्या भरतनाट्यम प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments