पुणे, २४ नोव्हेंबर २०२६: पूना रिजन ब्रिज असोसिएशन आणि महाराष्ट्र ब्रिज असोसिएशन यांच्या वतीने आयोजित अशोक वैद्य मेमोरियल अखिल भारतीय ब्रिज स्पर्धेत सांघिक गटात सोलानी व एके सिन्हाज ४ या संघांनी अनुक्रमे एसडी असोसिएट्स व फॉर्मीडेबल्स संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एके सिन्हाज ४ संघाने विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आलेल्या बलाढ्य फॉर्मीडेबल्स संघावर धक्कादायक विजय मिळवताना सांघिक गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या उपांत्य लढतीत एके सिन्हा, सत्यव्रत मुखर्जी, मीनल ठाकूर आणि कौशिक मुखर्जी यांचा समावेश असलेल्या एके सिन्हाज ४ संघाने कौस्तुभ बेंद्रे, कौस्तुभ नंदी, संदीप ठकराल आणि राजेश्वरी तिवारी यांचा समावेश असलेल्या फॉर्मीडेबल्स संघावर ३० गुणांनी आश्चर्यकारक मात केली. स्पर्धेतील हा सर्वाधिक सनसनाटी निकाल ठरला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत सोलानी संघाने तुल्यबळ एसडी असोसिएट्स संघाचे आव्हान मोडून काढताना अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सामन्यात जितू सोलानी, आनंद शहा, मिलिंद आठवले, अजय खरे यांचा समावेश असलेल्या सोलानी संघाने आनंद सामंत, विजय फातरफेकर, आर श्रीधरन आणि सुबीर मुजुमदार यांच्यासह इयान कांसेपियो व सुभाष भवनानी या दर्जेदार खेळाडूंचा समावेश असलेल्या एसडी असोसिएट्स संघाचा ३७ गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. फॉर्मीडेबल्स विरुद्ध एसडी असोसिएट्स यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे.


