Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorized*भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी...

*भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस*

 

*• संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड प्रस्तावित*

*• विशेष कृती दल, जलदगती न्यायालये आणि परीक्षा शुल्क परताव्याचीही शिफारस*

 

मुंबई, दि. २४ : राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. अपर मुख्य सचिव व्ही. राधा समितीचा हा दुसरा अहवाल असून एकूण चार टप्प्यात अहवाल सादर होणार आहे.

 

संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड, गैरप्रकारांमधून झालेल्या नुकसानीची वसुली तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दल (Special Task Force), खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

 

उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवारांची हरकत मान्य झाल्यास हरकत नोंदविण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.

 

राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय ४ सप्टेंबर २०२६ अन्वये उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसंदर्भातील पहिला अहवाल ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केला होता. त्यानंतर समितीने आपला दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनास सादर केला आहे. या अहवालात कायदेशीर तरतुदी, परीक्षा संचालन व्यवस्था, प्रशासकीय समन्वय, उमेदवारांच्या सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा याबाबत व्यापक सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत.

 

*पेपरफुटीविरोधी कायद्यात कठोर सुधारणांची शिफारस*

परीक्षांमधील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली आहे.

 

गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना कठोर शिक्षा होऊन अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, या उद्देशाने कारावासाची शिक्षा, दंडाची रक्कम आणि काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

 

संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती व संस्था : सध्याच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये ५ ते १० वर्षे कारावास, किमान १ कोटी रुपये दंड आणि परीक्षा खर्चाची वसुली अशी तरतूद आहे. समितीने ही शिक्षा वाढवून ७ ते १० वर्षे कारावास, किमान १० कोटी रुपये दंड, व्यापक नुकसानभरपाईची वसुली आणि मालमत्ता जप्तीची शिफारस केली आहे.

 

अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्ती : सध्या ३ ते ५ वर्षे कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. समितीने त्यात वाढ करून ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित केला आहे.

 

गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्था : सध्याच्या कायद्यानुसार १ कोटी रुपयांपर्यंत दंड, परीक्षेच्या प्रमाणशीर खर्चाची वसुली आणि चार वर्षांसाठी बंदी अशी तरतूद आहे. समितीने दंडाची मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत वाढविणे, परीक्षा खर्चाची वसुली करणे आणि संबंधित संस्थेला आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

 

सेवा पुरवठादार संस्थांचे संचालक व व्यवस्थापन : सेवा पुरवठादार संस्थेचे संचालक, व्यवस्थापनातील व्यक्ती किंवा संस्थेचा प्रभारी अधिकारी गैरप्रकारात सहभागी असल्यास त्यांच्यासाठी ५ ते १० वर्षे कारावास आणि ५ कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. सध्या या गुन्ह्यासाठी ३ ते १० वर्षे कारावास आणि १ कोटी रुपये दंडाची तरतूद आहे.

 

*परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे*

परीक्षा गैरप्रकारांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि बहुस्तरीय असल्याने अशा गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो. त्याऐवजी जिल्ह्यांमध्ये किमान अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात किमान पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यामुळे परीक्षा गैरप्रकारांमागील संघटित यंत्रणा, संबंधित व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध अधिक प्रभावी तपास करणे शक्य होणार आहे.

 

*गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दलाची स्थापना*

परीक्षा गैरप्रकारांमधील गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष कृती दल स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे.

अशा प्रकरणांचा तपास विशेष कृती दलाकडे सोपविण्याचे अधिकार देण्याबरोबरच संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी या दलाला विशेष अधिकारक्षेत्र देण्याची तरतूद करण्याचेही सुचविण्यात आले आहे.

 

*खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये*

परीक्षा गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांचे खटले दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत आणि दोषींवर वेळेत कारवाई व्हावी, यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या कायद्यांतर्गत सध्या प्रलंबित असलेले सर्व जुने खटलेही या विशेष न्यायालयांकडे वर्ग करून तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याची शिफारस समितीने केली आहे.

 

*मालमत्तेच्या व्याख्येत डिजिटल व आभासी मालमत्तांचाही समावेश*

संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या संस्था किंवा सेवा पुरवठादारांची मालमत्ता जप्त करताना कायदेशीर संदिग्धता राहू नये, यासाठी अधिनियमात ‘मालमत्ता’ या संज्ञेची व्यापक व स्पष्ट व्याख्या समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यामध्ये जमीन, इमारती, जंगम मालमत्ता, बौद्धिक संपदा, अमूर्त हक्क तसेच डिजिटल आणि आभासी मालमत्तांचाही समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे गैरप्रकारांतून मिळविलेली मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

 

*परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस*

उमेदवारांकडून परीक्षा शुल्कासंदर्भात सातत्याने करण्यात येणाऱ्या मागण्यांची दखल घेत समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्याने भरलेले संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत आयोगाने विचार करावा, असे समितीने सुचविले आहे.

यासाठी इतर राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उत्तम पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला आहे.

 

तसेच, उत्तरतालिकेवर उमेदवाराने घेतलेली हरकत आयोगाने मान्य केल्यास संबंधित उमेदवाराने हरकतीसाठी भरलेले शुल्क त्याला परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे परीक्षेची तयारी गांभीर्याने करणाऱ्या उमेदवारांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.

 

*भरती प्रक्रियेसाठी एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस*

विविध शासकीय विभागांकडून रिक्त पदांची मागणी प्राप्त होण्यापासून ते उमेदवारांच्या शिफारशीपर्यंतच्या संपूर्ण भरती प्रक्रियेचा समितीने सखोल अभ्यास केला आहे.

विभागांकडून रिक्त पदांची अनियमित माहिती मिळणे आणि परीक्षांचे वेळापत्रक निश्चित नसणे, या समस्या उमेदवारांनी समितीसमोर मांडल्या होत्या. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

सामान्य प्रशासन विभागाच्या २ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत रिक्त पदांची मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविणे आवश्यक आहे. या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची शिफारस समितीने केली आहे.

तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांना परीक्षांचे नियोजन आणि तयारी आगाऊ करता येणार आहे.

 

*महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी सुविधा*

उमेदवारांना विविध परीक्षांसाठी अर्ज करताना वारंवार प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करावी लागू नयेत, यासाठी महाआयडी (MahaID) किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी (One-Time Registration) सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या सुविधेमुळे उमेदवारांची कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची आवश्यकता कमी होईल. तसेच, परीक्षा दिलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात परत करणेही सुलभ होणार आहे.

 

*परीक्षांच्या देखरेखीसाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर*

परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय ‘एक्झाम कमांड अँड कंट्रोल सेंटर’ (Exam Command and Control Centre) स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे.

 

*या व्यवस्थेत तीन स्तरांवर नियंत्रण केंद्रे कार्यरत राहतील.*

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयात केंद्रीय नियंत्रण केंद्र.

२. जिल्हास्तरावर स्वतंत्र नियंत्रण केंद्र.

३. प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी नियंत्रण केंद्र.

या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे परीक्षा प्रक्रियेचे प्रभावी निरीक्षण, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि गैरप्रकार आढळल्यास तातडीने हस्तक्षेप करणे शक्य होणार आहे.

 

*जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कायमस्वरूपी परीक्षा शाखा*

जिल्हास्तरावर परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कायमस्वरूपी परीक्षा शाखा स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या शाखेमार्फत जिल्ह्यातील परीक्षा आयोजनासंदर्भातील विविध जबाबदाऱ्यांचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करता येणार आहे.

 

याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या समितीमध्ये पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त यांच्यासह शिक्षण, परिवहन, कोषागार आणि अन्य महत्त्वाच्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

या समितीमुळे विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय वाढून परीक्षा आयोजन अधिक सुलभ आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

 

*प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक*

राज्यातील विविध भरती व स्पर्धा परीक्षांसाठी पुरेशा आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी युक्त परीक्षा केंद्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र बँक (Venue Bank) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या बँकेमध्ये परीक्षा केंद्र म्हणून वापरता येऊ शकणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची अद्ययावत माहिती नोंदविण्यात येईल.

प्रत्येक केंद्राची आसनक्षमता, दिव्यांग व अन्य उमेदवारांसाठीची सुगम्यता आणि उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती या बँकेत समाविष्ट केली जाईल.

परीक्षा केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येईल. तसेच, जिल्हाधिकारी आपल्या नियंत्रणाखालील अधिकाऱ्यांमार्फत केंद्रांना नियमित भेटी देऊन तेथील माहिती अद्ययावत असल्याची खात्री करतील.

 

यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चित केलेल्या दरांनुसार शाळा व महाविद्यालयांच्या इमारती परीक्षा आयोजनासाठी ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची शिफारसही समितीने केली आहे.

 

*प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडा*

परीक्षांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर होणाऱ्या भरती परीक्षांसाठी स्वतंत्र सुरक्षा योजना आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान प्रतिबंधित तांत्रिक उपकरणांचा वापर रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यपद्धती निश्चित करावी, असे समितीने सुचविले आहे.

या मार्गदर्शक सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्या मार्गदर्शनाखाली महा-सायबर यांचा सल्ला घेऊन तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

*परीक्षा प्रणालींची सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या माहितीचे संरक्षण*

परीक्षा प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने परीक्षा प्रणालींची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर समितीने विशेष भर दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महा-सायबर आणि अन्य विशेष संस्थांच्या सल्ल्याने स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षांमधील गैरप्रकारांसाठी वापरली जाणारी सूक्ष्म संवाद उपकरणे, परिधान करता येणारे कॅमेरे (Wearable Cameras) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (Artificial Intelligence) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना विकसित करण्याची जबाबदारी या कक्षाकडे असावी, असे सुचविण्यात आले आहे.

याशिवाय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी नियुक्त करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

आयोगामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रणालीसाठी तसेच आयोगाच्या वतीने बाह्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रणालींसाठी एकात्मिक माहिती सुरक्षा धोरण जारी करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.

यामुळे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल प्रणालींची सुरक्षितता वाढण्याबरोबरच उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

 

*पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख भरती व्यवस्थेकडे महत्त्वपूर्ण पाऊल*

उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालामध्ये राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतील विविध त्रुटी दूर करण्यासाठी सर्वंकष सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई, सक्षम तपास यंत्रणा, जलद न्यायनिवाडा, परीक्षा केंद्रांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, जिल्हास्तरीय प्रशासकीय उत्तरदायित्व, तंत्रज्ञानाधारित देखरेख आणि सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे.

 

त्याचबरोबर उमेदवारांवरील आर्थिक भार कमी करणे, भरती प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करणे आणि विविध शासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातील समन्वय वाढविणे यावरही समितीने भर दिला आहे.

या शिफारशींच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता अधिक दृढ करणे, प्रामाणिक व पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि राज्यात पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह भरती परीक्षा व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश आहे.

 

समितीने या सर्व शिफारशी राज्य शासनाच्या विचारार्थ सादर केल्या आहेत.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments