पुणे : लोकसंगीताच्या क्षेत्रात कलोपासना करणाऱ्या आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या कलाप्रवासाचा आणि कार्याचा गौरव करणाऱ्या ‘ज्योतीने तेजाची आरती’ या गौरवग्रंथाचे आणि माहितीपटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शास्त्रीय संगीताला समर्पित असलेल्या सृजनसभा या संस्थेच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात हा सोहळा होणार आहे. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे या सोहळ्याचे उत्सवमूर्ती आहेत.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघांव, संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे आणि गुरुवर्य साखरे महाराज परंपरेचे उत्तराधिकारी डॉ. यशोधन महाराज साखरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या गौरवग्रंथाची आणि माहितीपटाची निर्मिती सृजनसभा प्रॉडक्शन व पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती सृजनसभा संस्थेचे प्रमुख संगीतरचनाकार होनराज मावळे यांनी दिली.
—


