Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवयव प्रत्यारोपण आणि अतिदक्षता उपचारांवरील डीपीयू क्रिटिकॉन २०२६ चे डॉ. डी. वाय....

अवयव प्रत्यारोपण आणि अतिदक्षता उपचारांवरील डीपीयू क्रिटिकॉन २०२६ चे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

 

२८ आणि २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय परिषदेत देशभरातील नामवंत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, अतिदक्षता तज्ज्ञ आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञ एकत्र येणार

पुणे, २५ नोव्हेंबर २०२६ : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या अतिदक्षता वैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी डीपीयू क्रिटिकॉन २०२६ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत अतिदक्षता वैद्यकशास्त्र, अवयव प्रत्यारोपण, संसर्गजन्य रोग आणि संबंधित वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञ एकत्र येऊन घन अवयव प्रत्यारोपण (Solid Organ Transplantation) झालेल्या रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनातील प्रगती आणि वैद्यकीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत.

‘प्रत्यारोपणातील अतिदक्षता उपचार आणि संसर्गजन्य रोग’ ही या परिषदेची संकल्पना असून, यामध्ये फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड प्रत्यारोपणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांचे व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध, रोगप्रतिकारशक्ती दडपणारी औषधोपचार पद्धती (इम्युनोसप्रेशन), अवयवांना आवश्यक आधार देणारे उपचार आणि प्रत्यारोपणानंतर रुग्णाची प्रकृती पूर्ववत होण्याची प्रक्रिया या विषयांचा समावेश असेल.

आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये सातत्यपूर्ण शिक्षण, वैज्ञानिक विचारांची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम करण्याचे डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांचे दूरदृष्टीपूर्ण ध्येय या परिषदेच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते. प्रगत वैद्यकीय ज्ञान आणि चिकित्साविषयक कौशल्य यांचा समन्वय साधण्यावर त्यांनी दिलेला भर डीपीयू येथे शैक्षणिक उत्कृष्टता आणि विशेषीकृत आरोग्यसेवांच्या विकासाला पाठबळ देणाऱ्या उपक्रमांना सातत्याने मार्गदर्शन करत आहे.

या परिषदेत नामवंत प्रत्यारोपण तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. यामध्ये केआयएमएस इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट, लंग ट्रान्सप्लांटेशन अँड असिस्ट डिव्हायसेस येथील संस्थापक संचालक तसेच प्रगत हृदय निकामी होणे, फुफ्फुसांचे अंतिम टप्प्यातील आजार आणि घन वक्षस्थलीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप अट्टावर, तसेच चेन्नई येथील डॉ. रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रोफेसर डॉ. मोहम्मद रेला यांचा समावेश आहे.

डॉ. अटवार हे ‘फुफ्फुस प्रत्यारोपणाचा प्रवास’ या विषयावर “डॉ. प्रशांत साखवळकर स्मृती” सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रा. रेला हे ‘यकृत प्रत्यारोपणातील शस्त्रक्रियाविषयक पैलू : अतिदक्षता तज्ज्ञांना काय माहिती असणे आवश्यक आहे?’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत.

या वैज्ञानिक कार्यक्रमात संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. राजीव सोमन, ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे आणि डॉ. वसंत नागवेकर, लीलावती हॉस्पिटल, मुंबई यांचाही सहभाग असणार आहे. त्यांच्या सत्रांमध्ये प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमधील बुरशीजन्य आणि विषाणूजन्य संसर्ग, सूक्ष्मजीवविरोधी उपचारपद्धती तसेच औषधांमधील परस्परक्रिया या विषयांचा समावेश असेल.

परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रत्यारोपणाशी संबंधित रोगप्रतिकारशास्त्र, संसर्ग प्रतिबंध, अवयवदात्यांचे व्यवस्थापन, ईसीएमओ (ECMO) उपचारांचा आधार आणि फुफ्फुस प्रत्यारोपणानंतरची अतिदक्षता यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड प्रत्यारोपणाशी संबंधित विषयांवर चर्चा होईल. यामध्ये भूलशास्त्र, शस्त्रक्रियेनंतरची अतिदक्षता, प्रत्यारोपित अवयवाचे कार्य बिघडणे, मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंत आणि पुनर्वसन यांचा समावेश असेल.

या परिषदेत वैज्ञानिक व्याख्याने आणि तज्ज्ञांच्या पॅनेल चर्चा आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्यारोपणापूर्वी, प्रत्यारोपणादरम्यान आणि प्रत्यारोपणानंतर उद्भवणाऱ्या विविध वैद्यकीय आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. तसेच गुंतागुंतीच्या प्रत्यारोपण प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, अतिदक्षता तज्ज्ञ, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट आणि इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांचा समावेश असलेल्या बहुविद्याशाखीय चमूच्या भूमिकेचाही आढावा घेतला जाणार आहे.

या परिषदेचे आयोजन डॉ. प्राची साठे, आयोजन समितीच्या अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. डॉ. शहजाद मिर्झा आणि डॉ. परीक्षित प्रयाग हे उपाध्यक्ष म्हणून, तर डॉ. असीर तांबोळी आणि डॉ. रिद्धी कुंडू हे आयोजन सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

डीपीयू क्रिटिकॉन २०२६ ही परिषद अतिदक्षता तज्ज्ञ, प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, फुफ्फुसरोगतज्ज्ञ, यकृतरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका आणि संबंधित आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (MMC) चार क्रेडिट गुणांसाठी अर्ज करण्यात आला आहे.

नोंदणीसाठी संकेतस्थळ : https://medical.dpu.edu.in/DPU-Criticon-2026/Default.aspx

ई-मेल : dpucriticon

2026@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments