पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रभू श्रीराम यांचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाची राजनीती यांचा संगम आहे. राजा म्हणून केवळ राज्याचा उपभोग घेण्यापेक्षा आपली प्रजा कशा प्रकारे सुखी होईल याचा विचार शिवाजी महाराज यांनी प्रथम केला, त्यामुळेच त्यांच्या स्वराज्याचे सुराज्यामध्ये रूपांतर होऊ शकले. आजच्या समाजाचे सुराज्यामध्ये रूपांतर होण्यासाठी समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात छत्रपती शिवराय आणि त्यांची राजनीती या विषयावर आयोजित व्याख्यानात बलकवडे बोलत होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष करण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून आपल्या समाजाचा विचार केला आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली तर निश्चितच आपला समाज आणि देश प्रगतीपथावर जाऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ वाचण्यासाठी नाही. त्यांचा विचार आचरणामध्ये आणला तर वैयक्तिक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकेल.
—


