पुणे : प्रभू श्रीराम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. पुरुषार्थ आणि परमार्थ यांचे अद्वैत म्हणजे श्रीराम. एकविसाव्या शतकाच्या चंगळवादी संस्कृतीत मूल्यांची रुजवण व्हावी, याउद्देशाने एक सुलभ रामचरित्र लिहिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉ. न. म. जोशी यांनी केले.
स्नेहल प्रकाशन तर्फे प्रकाशित डॉ. न. म. जोशी लिखित ‘मुलांचे श्रीराम’ या चरित्राचे प्रकाशन प्राचार्य राम दशरथ यांच्या हस्ते सदाशिव पेठेतील रहाळकर राम मंदिरात झाले. यावेळी स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, रहाळकर राम मंदिराच्या प्रभावती रहाळकर उपस्थित होते.
प्राचार्य राम दशरथ म्हणाले, मी राम दशरथ असलो, तरी माझे गुरु म्हणजे वसिष्ठ न.म.जोशी आहेत. त्यांच्या उपस्थितीत रामचरित्रांचे प्रकाशन व्हावे, ही मी माझे भाग्य समजतो, असेही त्यांनी सांगितले. रवींद्र घाटपांडे म्हणाले, हे पुस्तक घराघरात व घरातील प्रत्येकाच्या हातात गेले पाहिजे. कार्यक्रमानंतर प्रभावती रहाळकर यांचे रामजन्म पर सुश्राव्य किर्तन झाले.


