Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांचे नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

*उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांचे नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

 

पुणे, दि.२: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, यासाठीचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.

 

लोकसभा निवडणूकीच्या तयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

 

शहरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण भागात आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती यांची मदत घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील आणि ओआरएसचा साठा पुरेशा प्रमाणात राहील याचे नियोजन करावे. मोठ्या रांगा असतील वयस्कर मतदारांना खुर्च्या किंवा बाकाची व्यवस्था करावी. मतदाराला उन्हाचा त्रास झाल्यास त्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. दिव्यांग, महिला आणि वयोवृद्ध मतदारांसाठीदेखील अशी व्यवस्था असावी.

 

शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात यावे. शहरी भागातील कमी मतदान केंद्र परिसरात मतदार चिठ्ठी वाटपावर विशेष लक्ष द्यावे. उपनिबंधक सहकारी संस्थांच्या सहकार्याने संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांची मदत घेण्यात यावी. महिला, युवा, दिव्यांग, आदर्श मतदान केंद्रासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मदतीसाठी आवश्यक तेथे स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. शहरी भागात मतदार सहाय्यता केंद्राद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना डॉ.दिवसे यांनी दिल्या.

 

यावेळी ईव्हीएम यंत्राची तयारी, टपाली मतदान, वयोवृद्धांसाठी घरून मतदान, मतदानाच्या दिवशीची तयारी आदीं विषयांचा आढावा घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments