Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळ लोकसभा मतदारसंघ उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी

मावळ लोकसभा मतदारसंघ उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी

 

 

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आज आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारतीमधील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पार पडली.

 

निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी खर्च प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी प्रक्रिया पार पडली.

भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, याद्वारे उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी दि.७ मे रोजी आणि तिसरी तपासणी दि. ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

 

उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील दुसर-या आणि तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व उमेदवारांना दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ९५ लाख रूपये इतकी आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम,१९५१ कलम ७८ अन्वये निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत उमेदवाराने हिशोब दाखल करणे आवश्यक आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments