पुणे : सेवा मित्र मंडळाच्या वतीने पुण्यातील आपलं घर, संतुलन पाषाण, श्रीवत्स, वंचित विकास यांसह विविध सामाजिक संस्थांमधील वंचित-विशेष मुलांसाठी ‘मामाच्या गावची सफर’ हा उपक्रम तब्बल २५ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. उपक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या सफरीतील किस्से, महत्त्वाच्या घटना, प्रसंग समाविष्ट असणाऱ्या ‘मामाच्या गावची सफर’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. यावेळी गुप्तवार्ता प्रबोधिनीचे माजी संचालक चंद्रशेखर दैठणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, किरण जावळकर श्रीकांत गबाले, उत्कर्ष महाले , साहिल चव्हाण, कुणाल जाधव ,सार्थक बांदल, अर्जुन ढगे, संकल्प भालेराव, सुरेश तरलगट्टी,नरेंद्र ससाणे, मल्हार मोहिते उपस्थित होते.
ल. म. कडू म्हणाले, एखादी गोष्ट नाही म्हणून कलेपासून दूर राहू नका, साधनांशिवाय साधना करता आली पाहिजे. मुलांनी लहान वयापासूनच लेखन आणि चित्रे काढायला पाहिजे.
चंद्रशेखर दैठणकर म्हणाले, सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्य ठेवणे अवघड असते परंतु तब्बल २५ वर्षे मामाच्या गावाची सफर हा उपक्रम सेवा मित्र मंडळाने सुरू ठेवला आहे. अशीच आनंद देणारी सेवा त्यांनी यापुढेही सुरू ठेवावी.
आनंद सराफ म्हणाले, मामाच्या गावची सफर हा उपक्रम मागील २५ वर्षापासून सातत्याने राबविला जात आहे. त्यामुळे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेली ही स्मरणिका महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या संस्थांना देण्यात येणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र भरातील वंचित विशेष मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे येतील. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते अनेक चांगली कामे करतात परंतु ते सांगण्यात ते कमी पडतात. या स्मरणिकेच्या माध्यमातून ते काम राज्यभरात पोहोचेल.
श्रीकांत गबाले म्हणाले, मामाच्या गावाहून परत जाताना या मुलांचे चेहरे उदास झालेले असतात. परंतु जाताना ते एक वेगळी ऊर्जा सोबत घेऊन जातात. खूप मेहनत करा. आपल्या माणसांना विसरू नका, असेही त्यांनी मुलांना उद्देशून सांगितले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचाल
न केले.


