पुणे मे १४ २०२४: जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी दिवसभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. थॅलेसेमिया रुग्णांना त्यांची वैयक्तिक प्रगती, आरोग्याची काळजी, संभाव्य परिणाम, औषधोपचार, त्याच्यातील आत्मविश्वास वाढीबरोबर, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याच्यात सकारात्मक वृत्ती वाढीसाठी सामूहिक खेळामध्ये सहभागी होण्याची संधी देऊन त्यांचे सक्षमीकरण आणि विकास करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे आणि त्याच्यासाठी आयुष्यभर वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात, त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना शारीरिक आणि भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते. या अनुषंगाने रुग्ण आणि कुटूंबियांचे मानसिक स्वास्थ्य देखील गरजेचे आहे हे लक्षात घेऊन हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. रुग्ण, पालक तसेच डॉक्टर्स इतर स्टाफ यांना एकत्र करीत यांच्यातील स्नेह वाढवात जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सचे (आयएपी) सचिव डॉ. महेश सुलक्साने उपस्थित होते. त्यांच्यासह डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे.एस. भवाळकर, शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ.पी. वत्सलस्वामी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एच. एच चव्हाण, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने, हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट, वरिष्ठ सल्लागार आणि तज्ज्ञ हेमॅटोलॉजिस्ट डॉ. ज्ञानेश्वर उपासे हे देखील उपस्थित होते.
थॅलेसेमिया रुग्णांसह त्यांचे कुटुंबीय, इतर आरोग्यसेवा व्यावसायिक आणि समाजातील मान्यवर व्यक्तीनीही या अभ्यासपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती लावून थॅलेसेमियाशी लढा देत असलेल्या रुग्णांच्या कल्याणासाठी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला हातभार लावला.
डॉ. महेश सुलक्साने म्हणाले, “संस्थेने त्यांच्या थॅलेसेमिया रुग्णांच्या कल्याणासाठी घेतलेले हे विशेष प्रयत्न पाहून खूप आनंद झाला. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र हे थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत असून लोकांमध्ये उत्तम आरोग्य सेवेबाबत जाणीव निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, म्हणाले, “थॅलेसेमियाशी लढा देणाऱ्या लोकांसाठी या आजाराबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्याकरिता आपण एकजुटीने उभे राहिले पाहिजे. त्यांच्या दैनंदिन जीवनात आव्हाने असूनही त्यांना परिपूर्ण जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आत्म-सन्मान वाढण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे ते या आजाराला तोंड देताना येणाऱ्या अडचणींना अधिक सक्षमपणे सामोरे जाऊ शकतील. उपलब्ध उपाययोजनांचा योग्य पद्धतीने वापर करणे त्यांना शक्य होईल.”
डॉ. ज्ञानेश्वर उपासे म्हणाले, “ प्रत्येक व्यक्ती तिची आर्थिक आणि शारीरिक स्थिती कशीही असली तरी तिच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची संधी मिळण्यासाठी पात्र आहे, असा आमच्या संस्थेचा विश्वास आहे. आज या दिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊन आपण या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकतो आणि त्यांना या धकाधकीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने भरभराटीची संधी देऊ शकतो. ” डॉ. उपासे यांनी या आजारावरील प्रगत उपचारांचीही माहिती दिली. यात अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) , लुस्पेटरसेप्ट इंजेक्शन्स सारख्या उदयोन्मुख नॉन-ट्रान्सफ्युजन थेरपी आणि लोह चेलेशन थेरपीसह रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्युजन) आदींचा समवेश होता. थॅलेसेमिया रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी नियमित तपासणीवरही त्यांनी भर दिला.
यावेळी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर म्हणाले, “आमची संस्था थॅलेसेमिया रूग्णांना वैद्यकीय उपचारांच्या पलीकडे सर्वांगीण उपाययोजना देण्यासाठी वचनबद्ध आहे. या रुग्णांना केवळ शारीरिकच नाही, तर भावनिक आधाराचीदेखील आवश्यकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. या कार्यक्रमाद्वारे, त्यांच्या जीवनाचा दर्जा वाढवून आत्मसन्मानाची भावना वाढवण्याचे आमचे ध्येय आहे.”
या कार्यक्रमात थॅलेसेमिया रूग्णांच्या आवडीनिवडीसंह क्षमतांची पूर्तता करणाऱ्या अनेक सॉफ्ट स्किल्स विकासाच्या विविध कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. यात व्यावसायिक कौशल्यांपासून ते शैक्षणिक संधींपर्यंत विविध गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव रूग्णांना घेता आला, ज्यामुळे त्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात मदत होईल अशी कौशल्ये त्यांच्यात आहेत याची खात्री करून घेता आली. या व्यतिरिक्त, संस्थेने रुग्णांची अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, संगीत, निबंध लेखन आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यांचा वैयक्तिक विकास आणि प्रगतीसाठी पूरक असे हे उपक्रम होते.
डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांनी पुन्हा एकदा अशा उपक्रमांचे आयोजन करून, थॅलेसेमियाबद्दल जनजागृती करण्याच्या व्यापक प्रयत्नांसाठी समुदायाच्या कल्याणासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या आजाराने बाधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर होणाऱ्या परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.


