पुणे, 23 मे २०२४ : एस हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टरांच्या टीमने 58 वर्षीय परदेशी महिलेच्या अधिवृक्क ग्रंथीतून काढलेल्या सुमारे 23 सेमी आकाराचा ट्यूमर यशस्वीरीत्या काढल्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नुकतीच करण्यात आली आहे. शरीरातील एड्रिनल ग्रंथीच्या म्हणजेच अधिवृक्क ग्रंथीतील सर्वात मोठी गाठ काढण्यासाठी मार्च 2023 मध्ये एस हॉस्पिटलमधील मूत्रविकार तज्ञांच्या टीमने यशस्वीरित्या थ्रीडी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया केली होती.
शरीरामध्ये एक साधारणत: चार ते आठ ग्रॅम या वजनाची ४ X ३ सें.मी. या आकाराची असलेली ही ग्रंथी दोन्ही मूत्रपिंडाच्या डोक्यावरती असते. या ग्रंथीला शरीराच्या कार्यक्षतेमध्ये फारच महत्त्वाचे स्थान आहे. ऍड्रिनॅलिन व स्टेरॉईड हीअत्यंत जीवनावश्यक अशी संप्रेरके किंवा हार्मोन / स्त्राव या ग्रंथी मध्ये तयार केले जातात. या अधिवृक्व ग्रंथी मध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. या आजारांमध्येच सिस्ट म्हणजेच पाण्याच्या बुडबुड्यासारखी गाठ हा एक दुर्मिळ प्रकारचा आजार आहे. यामध्ये गाठ मोठी असल्यास म्हणजे सर्वसाधारणपणे १५ सें.मी. पेक्षा मोठी असल्यास बहुतांशी वेळा खुली (ओपन) शस्त्रक्रिया करावी लागते.
५८ वर्षीय परदेशी महिला गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाठदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी घेऊन एस हॉस्पिटलमध्ये आली होती. सीटी स्कॅन तपासणीमध्ये साधारणत: १५ सें.मी.ची अशी गाठ एड्रिनल ग्रंथीच्या डाव्या बाजूस या रुग्णामध्ये दिसून आली. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रियेच्या भीतीने तिने पुढील उपचार करण्याचे टाळले होते. पुढे तक्रारी कमी न झाल्यामुळे शेवटी त्यांनी भारतात वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या पुण्यातील एस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या.
पुन्हा सीटी स्कॅनची तपासणी केल्यानंतर हीच गाठ आता 23 सें.मी. पर्यंत वाढलेली दिसून आली. या गाठीने रुग्णाच्या शरीरातील पोटामध्ये जवळजवळ अर्ध्यावर अधिक भाग व्यापला होता. ही गाठ डाव्या भागात असल्यामुळे डावे मूत्रपिंड, प्लीहा व स्वादुपिंड आणि मोठे आतडे यांना घट्ट चिटकून बसली होती. अशा परिस्थितीत पोट फाडून म्हणजे नेहमीची शस्त्रक्रिया करणे जास्त सुरक्षित होते, परंतु रुग्णाला स्वतःला कोणत्याही परिस्थितीत खुली (ओपन) शस्त्रक्रिया करायची नव्हती, त्यामुळेच तिने तिच्या देशात उपचार न घेता भारतात यायचे ठरवले होते. एस हॉस्पिटलच्या यूरोलॉजी तज्ञांनी त्या रुग्णाला समजून सांगितले की, दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करता येईल परंतु गरज पडल्यास खुली (ओपन) शस्त्रक्रिया करावी लागेल.
रुग्ण यासाठी तयार झाल्यानंतर थ्रीडी लॅप्रोस्कोपी या आधुनिक दुर्बिणीच्या तंत्राने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. त्यासाठी साडेचार तास वेळ लागला. अत्यंत कुशलतेने आजूबाजूचे सर्व अवयव बाजूला करून फक्त ट्यूमरची गाठ अधिवृक्काला कोणताही धक्का न लावता काढण्यात यश आले. बहुतांशी वेळा अशा शस्त्रक्रियेत अधिवृक्कही काढावे लागते. या गाठीतूनच 3 लिटर फ्लूइडही काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर चार दिवसात रुग्ण पूर्ववत झाला.
शस्त्रक्रिया करणाऱ्या या मूत्रविकार तज्ञांच्या टीममध्ये प्रा.डॉ. सुरेश पाटणकर, वरिष्ठ यूरोलॉजी तज्ञ डॉ. गुरुराज पडसलगी, यूरोलॉजिस्ट डॉ. मयूर नारखेडे व डॉ. काशिनाथ ठाकरे यांचा समावेश होता. तसेच भूलतज्ञांमध्ये डॉ.सोनाली वस्ते यांचा समावेश होता, सहाय्यक परिचारिका सुनिता बांगर, उषा बावधने, सविता कोकरे, मंदा बहिर, बापू कांबळे आणि राहुल साबळे यांचा समावेश होता.
या संदर्भात सर्व महत्वाच्या अशा शास्त्रीय वैद्यकीय नियतकालिकचा शोध घेण्यात आला. त्यात असे दिसून आले की आतापर्यंत भारतामध्ये 20 सें.मी. पर्यंत गाठ दुर्बिणीने काढण्यात आली होती, तर सर्व जगामध्ये आतापर्यंत पर्यंत 22 सें.मी.पर्यंत गाठ काढल्याची नोंद आहे. मात्र आता एस हॉस्पिटल मध्ये थ्रीडी लॅप्रोस्कोपी द्वारे काढल्या गेलेल्या या 23 सें.मी. गाठीची नोंद ही आतापर्यंत काढलेली ही सर्वात मोठी गाठ अशी झाली आहे.
एस हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले की, हा फक्त आमच्या रुग्णालयाकरिता नव्हे तर पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एकीकडे पुण्याला प्रमुख वैद्यकीय केंद्र म्हणून ओळख निर्माण होत असताना हा टप्पा पुण्यात कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रियांवर रुग्णांचा वाढता विश्वास प्रतिबिंबित करतो.


