पुणे, दि. 8 जून २०२४ : अन्य तांत्रिक क्षेत्रांबरोबरच आता ॲनिमेशन (सचेतन चित्र) क्षेत्रातही ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ते) चा वापर आता अनिवार्य होत असून ‘एआय’सह ॲनिमेशन निर्मितीचे प्रशिक्षण सुरू करत असल्याचे अनुभवी ॲनिमेशनतज्ज्ञ आणि टोड्स टेक्नोलॉजी ऑफ डेव्हलपमेंटचे संस्थापक-संचालक गणेश रेशवाल यांनी त्यांच्या पुण्यातील पहिल्या ॲनिमेशन प्रशिक्षण स्टूडिओच्या उद्घाटन प्र्रसंगी सांगितले. ‘एआय’मुळे ॲनिमेशन क्षेत्रातील रोजगार कमी होणार नसून त्याचे स्वरूप बदलल्यामुळे या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त केलेल्यांसाठी मोठा वाव निर्माण होणार असून स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईपाठोपाठ आता पुणेही ॲनिमेशन स्टूडिओ आणि प्रशिक्षणाचे केंद्र बनत असून रेशवाल यांच्या घोले रोड येथील स्टूडिओचे औपचारिक उद्घाटन त्याचे वडील शिवलाल आणि मातोश्री पुनाबाई रेशवाल यांनी शुभाशिर्वाद देऊन केले. यावेळी या प्रशिक्षण स्टूडिओचे प्रमूख रवींद्र पाटील, निर्मिती व्यवस्थापक राजेश खेले तसेच ॲनिमेशन क्षेत्रातील अनेक दिग्गज, व्यावसायिक, प्रशिक्षक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रेशवाल म्हणाले की, ॲनिमेशन या दृश्यनिर्मितीच्या माध्यमात सृजनशक्तीला अधिक वाव मिळावा यासाठी ‘एआय’चे टूल आणि तंत्रज्ञान मोठी क्रांती करेल. अशावेळी ‘एआय’ला घाबरून न जाता या तंत्राशी स्वत:ला जोडता आले पाहिजे. यातून ॲनिमेशन निर्मितीतील सृजनशीलतेबरोबर कार्यक्षमतेत वाढ वेळेतही मोठी बचत होईल. या साऱ्याची आज ॲनिमेशन क्षेत्रातील व्यावसायिक सफाईसाठी आवश्यकता आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना यासाठी ॲनिमेशन क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेली नवनवीन ‘एआय’ टूल्स वापरता येणार आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या मनातील आत्मविश्वास वाढीस लागेल.
‘एआय’च्या वापरासह सध्या ॲनिमेशन निर्मितीसह व्हीएफएक्स, गेमिंग, ग्राफिक्स आणि यूआययूएक्स या क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असून आपल्या प्रशिक्षण संस्थेतर्फे या नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांसाठी लागणारे प्रशिक्षणही देणार असल्याचे रेशवाल यांनी सांगितले.
रेशवाल यांचे ॲनिमेशन क्षेत्रात गेली दहा वर्षे निर्मिती व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम चालू असून त्यांनी अनेक दूरदर्शन मालिका आणि हिंदी-मराठी चित्रपटांच्या ‘व्हिजुअल इफेक्ट्स’चे दिग्दर्शन करताना अनेक पुरस्कार मिळवले आहेत. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ते त्यांच्या अशा निर्मिती प्रकल्पात सहभागी करून घेणार आहेत.यातून या व्यवसायातील गरजा व त्यासाठी लागणारे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण यातील दरी भरून काढणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे शहर व परिसरातील ॲनिमेशन क्षेत्रासंबंधी माहिती सांगताना रवींद्र पाटील व राजेश खेले म्हणाले की, शहरात सध्या सुमारे 60 ॲनिमेशन स्टूडिओ असून या क्षेत्रातील व्यावसायिक गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील फ्लाईंग टोड्स या सुमारे प्रत्येकी सत्तर ॲनिमेशन क्षेत्रातील ॲनिमटर्ससह पुण्यातील निर्मिती स्टूडिओही सुसज्ज झाला आहे. बारावी नंतर तीन वर्षांच्या पदवी प्रशिक्षणाच्या या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना बॅचलर इन व्होकेशनल गायडन्स (बी.व्होक.) ही पदवी देण्यात येईल.


