पुणे, १५ जुलै २०२४ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) प्र – कुलपती डॉ.स्वाती मुजुमदार आणि कुलगुरू डॉ. राजेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कौशल्य स्पर्धा,कौशल्य प्रात्यक्षिके,प्रश्नमंजुषा, डिझाइन कौशल्य, हेल्थ अँड ब्युटी क्षेत्रातील कौशल्य,कार्यशाळा,करिअर,उद्योजकता, स्टार्टअप संबंधी मार्गदर्शन इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमात स्कूल ऑफ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग,स्कूल ऑफ न्यूट्रीशनल सायन्सेस अँड डायटेटिक्स,स्कूल ऑफ रिटेल मॅनेजमेंट,स्कूल ऑफ ब्युटी अँड वेलनेस, स्कूल ऑफ मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, स्कूल ऑफ आर्किटेक्चर,अर्बन डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग,स्कूल ऑफ डिजिटल मीडिया मार्केटिंग, स्कूल ऑफ डेटा सायन्स,स्कूल ऑफ कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, स्कूल ऑफ सीएसआयटी , स्कूल ऑफ बीएफएसआय, स्कूल ऑफ पोर्ट्स अँड टर्मिनल मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी स्टडीज मधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, विविध कार्यक्रमांसह कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि केवळ नोकरी शोधणारेच नव्हे तर रोजगार निर्माण करणारी युवा पिढी तयार करणे आहे. जागतिक युवा कौशल्य दिन हा विद्यार्थ्यांसाठी उद्योग तज्ञांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आणि विविध स्पर्धांसाठी सहकारी विद्यार्थ्यांसोबत सहयोग करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे.
जागतिक युवा कौशल्य दिन २०२४ ची संकल्पना शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्ये (युथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट) ही असून शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तरुणांना कौशल्य निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.


