शाळेचे आद्यसंस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या एकशे पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या लोकमान्य टिळकांच्या पंचाहत्तर व्यक्तिचित्रांच्या
प्रदर्शनाचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले आहे.
दिनांक १ ऑगस्ट रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार अनिल उपळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका सुनीता राव, इतिहास अभ्यासक प्रांजल अक्कलकोटकर, मिलिंद सबनीस हे उपस्थित होते.
शाळेच्या गणेश सभागृहात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रांजल अक्कलकोटकर यांनी ‘लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान दिले. ‘लोकमान्य टिळक हे तलवारीची मूठ होते, तर सावरकर हे तलवारीची पात होते. तलवारीची मूठ ही दिशा दाखवते, तर तलवारीची पात आघात करते.’ अशा शब्दांत त्यांनी दोन्ही राष्ट्रवीरांच्या कर्तृत्वाचे वर्णन केले.
शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या १९७५ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वाचा गौरव योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून केला. माजी विद्यार्थी उमेश देव यांनी दहावीत विज्ञान विषयात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले रोख पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक रोणित सुतार आणि शुभ रोटे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी प्रास्ताविकाबरोबरच मान्यवरांचा परिचयही करून दिला. अजित शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विकास पढेर यांनी सूत्रसंचालन केले.


