▪️*३५ ते ४० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल्स; स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराची संधी*
पुणे, दि. २७: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), वन धन केंद्र आणि ऋषिकेश परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माळशेज घाट परिसरात ‘रानभाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले.पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व आणि त्याचे ज्ञान स्थानिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आदिवासी बांधव व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला आहे.
माळशेज घाटाच्या निसर्गरम्य वातावरणात भरविण्यात आलेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पारंपरिक रानभाज्या, आदिवासी खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांचे संवर्धन करणे हा होता. महोत्सवात ३५ ते ४० प्रकारच्या विविध, दुर्मिळ आणि पौष्टिक रानभाज्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.
स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह माळशेज घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पर्यटकांनी विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेत खरेदी केली.
या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन न घडविता आदिवासी महिला लाभार्थी आणि स्थानिक महिला बचत गटांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही देण्यात आली. त्यामुळे महिला सक्षमीकरणासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास या उपक्रमाची मदत झाली.
स्थानिक रानभाज्यांना बाजारपेठ, आदिवासी खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ आणि महिला बचत गटांना रोजगाराची संधी देणारा हा उपक्रम माळशेज घाटातील पर्यटकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
महोत्सवाला राज्यपाल नियुक्त सल्लागार ॲड. किरण गभाले, पुणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती तुळशीराम भोईर, युवराज लांडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विष्णू गाडेकर, शंकर अण्णा कुमकर, ऋषिकेश परिवाराचे अध्यक्ष सुरेश जोशी, खूबीचे सरपंच श्री. काटे, पारगावचे उपसरपंच विनायक चकवे यांच्यासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी, विविध शासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
000


