पुणे: गर्भाशयाचे मुख कमकुवत असल्याने दुस-या तिमाहीत सलग सहा वेळा गर्भपात झालेल्या 34 वर्षीय महिलेने पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये 2.7 किलोग्रॅम वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला आहे. डॉ. सुप्रिया पुराणिक(9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, अंकुरा हॉस्पिटल, पुणे) तसेच डॉ. स्वप्नील लंगडे (वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच एंडोस्कोपिक सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली टिमने महिलेची सातवी गर्भधारणा यशस्वीपणे पूर्ण करत आई आणि बाळ दोघांनाही सुखरुप बाहेर आणले.
शीना शर्मा (नाव बदलले आहे)* ही मुंबईतील गृहिणी जी तिच्या माहेरी म्हणजेच पुण्यात प्रसुतीसाठी आली होती, ती 8 आठवड्यांची गरोदर असताना डॉ सुप्रिया पुराणिक यांच्याकडे उपचारासाठी गेली. रुग्णाचा गर्भपाताचा पूर्वीचा इतिहास पाहता प्रत्येकवेळी गर्भधारणेच्या पाचव्या ते सहाव्या महिन्यांदरम्यान तिचा गर्भपात झाला होता. या महिलेच्या दुसऱ्या गर्भधारणेपासून प्रत्येकवेळी तिच्या गर्भाशय मुखाला योनीमार्गातून टाका घालण्यात आला होता. तरी देखील वारंवार गर्भपाताला होत होते. मात्र हा वैद्यकिय इतिहास पाहता यावेळी प्रसंगावधान राखत गर्भधारणेदरम्यान योग्य काळजी आणि व्यवस्थापन करत डॅाक्टरांनी ही गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला.यावेळी आई आणि मूल या दोघांना सुखरुप ठेवण्यात अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले.
डॉ. सुप्रिया पुराणिक(संचालक – 9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग, अंकुरा हॉस्पिटल, पुणे ) सांगतात की, ही गर्भवती महिला गर्भधारणेच्या आठव्या आठवड्यात अंकुरा हॉस्पिटल येथे तपासणीसाठी आली होती. वारंवार गर्भपाताचा तिचा वैद्यकीय इतिहास पाहता योग्य ती खबरदारी घेत वैद्यकिय सल्ल्यानसार पुढचा प्रवास सुरळीत राखण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला. गर्भवती महिलेच्या गर्भधारणेतील अडथळे दूर करण्यात आले. वैद्यकिय इतिहास पाहता महिलेच्या गर्भाशयाचे मुख कमकुवत असल्याची समस्या दिसून आली. गर्भाशयाचे मुख कमकुवत असल्याने हे गर्भाशय मुख वेदनारहितपणे उघडते आणि संबंधीत महिलेची प्रसुती होते, ज्यामुळे पाचव्या ते सहाव्या महिन्यांत गर्भधारणा संपुष्टात येते. तिच्या आठव्या आठवड्याच्या स्कॅनमध्ये ( पहिल्या तपासणीमध्ये) बाळाच्या हृदयाचे ठोके नियमित असल्याचे दिसून आले. सुमारे 12 आठवड्यांनी करण्यात आलेल्या एनटी स्कॅनमध्ये एक निरोगी गर्भ दिसून आला. मात्र गर्भवती महिलेच्या गर्भाशयाचे मुख काहीसे उघडले होते आणि तिच्या गर्भाशय मुखाची लांबी 2 सेंटीमीटर इतकी कमी झाली होती. अशावेळी सावधगिरी बाळगून डॉक्टरांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले.
डॉ पुराणिक पुढे सांगतात की, सुरु असलेल्या गर्भधारणेस सुरक्षित ठेवण्यासाठी या महिलेचे ओटीपोट उघडून गर्भाशयाच्या मुखाला टाके घातलण्यात आले. गर्भाशयाचे मुख हे दोन भागात विभागले जाते त्यातील एक भाग भाग योनीमार्गात आढळून येतो तर दुसरा भाग हा योनीमार्गाच्या वर म्हणजेच ओटीपोटात असतो. सामान्यतः गर्भाशय मुखाला टाके घालताना ते योनीमार्गातून घातले जातात. मात्र, जेव्हा आपण ओटीपोट उघडून टाके घालतो तेव्हा ते आणखी मजबूत होतात. यानंतर देखरेख आणि बारकाईने लक्ष ठेवत या महिलेची गर्भधारणा सुरळीतपणे सुरु होती. 37 आठवड्यात पूर्ण-मुदतीची गर्भधारणा पूर्ण करत सी सेक्शनने 7 सप्टेंबर रोजी 2.7 किलोग्रॅम वजनाच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. आई आणि बाळाची या दोघांची तब्येत चांगली आहे आणि 10 सप्टेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आले.
गर्भाशयाचे मुख कमकुवत असणे हे दुसऱ्या तिमाहीत वारंवार गर्भपात होण्यामागचे प्रमुख कारण आहे. गर्भधारणेपूर्वी रुग्णाने वैद्यकीय सल्ला घेतला असता, तर तिला गर्भधारणेपुर्वी त्यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीवर टाके घालण्याचा सल्ला दिला असता. दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीवर टाके घालण्याची ही एक कीहोल शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये पोटातून गर्भपिशवीला टाका घालता येतो. या प्रकारची शस्त्रक्रिया फार क्वचितच केली जाते. या प्रतिबंधात्मक उपायाने गर्भधारणेदरम्यान शस्त्रक्रियेची गरज नाहीशी झाली असती. ही परिस्थिती गर्भधारणेपूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आणि त्यानुसार उपचार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
आमच्यासाठी हे केवळ शारीरिकच नाही तर एक मानसिक युद्ध होते. सर्व अडथळ्यांना झुगारून आणि वारंवार होणाऱ्या गर्भपाताच्या तोंड देत अंकुरा हॉस्पिटलमध्ये आम्ही एका निरोगी बाळाला जन्म दिला. आमच्यासाठी हा एक चमत्कारच होता. चिमुकलीच्या आगमनानंतर आम्ही खुप खुश आहोत. आम्हाला जीवनाचा एक नवीन मार्ग दिल्याबद्दल डॉ. पुराणिक आणि त्यांच्या टीमचे आम्ही कायम ऋणी आहोत अशी प्रतिक्रिया रुग्ण शीना शर्मा (नाव बदलले आहे)* यांनी व्यक्त केली.


