Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनन्य भावाने भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे*  *ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे...

अनन्य भावाने भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे*  *ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे (परळी वैजनाथ) यांचे प्रतिपादन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मास कीर्तन महोत्सवाला प्रारंभ – दिवस १ ला* 

 

 

पुणे : जो जो परतंत्र, पराधीन आहे त्याला भगवंताच्या शरणागती शिवाय पर्याय नाही. आपण सगळे पराधीन आहोत. आपली आपल्या इंद्रियावर सत्ता नाही. आपली काळावर सत्ता नाही. त्यामुळे भगवंताला आपण शरण गेले पाहिजे. आपण शरण जातो परंतु सर्व भावाने नाही, तर हातचे राखून आपण शरण जातो. अनन्य भावाने भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे आहे,

असे प्रतिपादन ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे (परळी वैजनाथ) यांनी केले.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शरणागती कोणी, कशी आणि का करावी याबद्दल ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे म्हणाले, आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायाला हव्या. ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, त्या सैनिकांना आणि ज्यांच्यासोबत आपल्याला जगायचे आहे त्या दुर्बल घटकांना लक्षात ठेवा. एक वेळ मंदिर दिसल्यानंतर हात जोडले नाही तरी चालेल. पण देशाचा सैनिक दिसल्यावर अभिवादन करायला विसरू नका.

 

काळावर सत्ता फक्त संतांनीच का गाजवली याचे कारण सांगताना ते म्हणाले, संतांचा प्रवास हा फक्त देवासाठी, दुर्बल घटकांसाठी आणि समाजासाठी होता. ‘आनंदे भरून तिन्ही लोक’ या भावनेने ते जगले म्हणून काळावर सत्ता त्यांनी गाजवली.

 

महोत्सवात दररोज सायंकाळी ५.३० वाजता अनुक्रमे मराठवाडयातील विदर्भ रथ ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, देहू गाथा मंदिर येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments