पुणे, दि. १६ ऑगस्ट २०२४ : पुणे महानगरपालिका आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) सहयोगातून पुणेकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दोन स्वतंत्र आगळ्या-वेगळ्या प्रतिकात्मक त्रिमिती आकृतीबंधातून देण्यात आल्या. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाजवळ आणि शिंदे-भोसले आर्केडसमोर अनुक्रमे ‘कमान’ (आर्च) आणि ‘नमस्ते’चे (ग्रीटिंग) प्रतिक असणारे हे दोन डिजिटल आर्किटेक्चर डिझाईनचे आकृतीबंध बीएनसीएमधील पदव्युत्तर डिजिटल आर्किटेक्चर विभागातील प्रा.अमर शेट्टी याच्या संकल्पनेतून त्यांनी साकारले. या कामात पुणे महानगरपालिकेचे आर्किटेक्ट निखिल मिजार यांनी पुढाकार घेतला. तसेच बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या प्रेरणेतून आणि उपप्राचार्य डॉ.शार्वेय धोंगडे यांच्या सहयोगातून डिजिटल आर्किटेक्चर विभाग प्रमूख प्रा.धनश्री सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची निर्मिती व उभारणी केली. ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून अनेक पुणेकर तरुण-तरुणींनी तिथे छायाचित्रे काढली.
यातील ‘नमस्ते’ची निर्मिती वक्राकार पोकळ नळ्यांपासून बनवलेली असून त्यावर एक वायर ताणून व विणून बसवली आहे. तर ‘कमानी’वर बसवलेले विविध पंचकोनी आकार आतील सांगाड्यात अडकवलेले आहेत. त्यातून एका कलात्मक प्रवेशद्वाराचे साधर्म्य जाणवते.
या डिजिटल डिझाईनसाठी लागणाऱ्या कामात बीएनसीएतील डिजिटल फॅब्रिकेशन लॅबचे (डीएफएल) पर्यावेक्षक योगेश कुलकर्णी व सहकारी नीलेश जाधव, अहमद शेख आणि तेजस हे सुतारकाम कारागीर, तसेच शिपाई मुकेश आणि स्वप्नील यांची मदत झाली. या आकृतीबंधांच्या उभारणीच्या कामाचे व्यवस्थापन अमोल हिंगे, शिल्पा पाठक आणि अतुल भालेकर यांनी के
ले.


