पुणे : आजची परिस्थिती भयावह आहे जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. माणसाची गुणवत्ता, माणुसकी पाहण्यापेक्षा जात आधी पाहिली जाते, हे दुर्दैव आहे. जातीपातीच्या राजकारणामुळे समाज रसातळाला जाईल अशी परिस्थिती आहे. देश आणि राज्यासाठी काम करणाऱ्यांना कोणतीही जात न पाहता उचलून धरले पाहिजे. यासोबतच हिंदुत्वाचे काम उघडपणे करणे गरजेचे आहे. उदारमतवाद ठेवून चुकीच्या गोष्टींना वाव नको. असे मत आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
हर घर सावरकर समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित नि:शुल्क वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवतारे यांच्या हस्ते कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे झाला. यावेळी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे चेअरमन रवींद्र साठे, माजी खासदार प्रदीप रावत, केदार बापट, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, रवींद्र साठे, सात्यकी सावरकर, समितीचे देवव्रत बापट उपस्थित होते.
सचिन करडे, चिन्मय टिळक, सुप्रिम मस्कर, प्रांजल अक्कलकोटकर, अन्वी जाधव, भागवत मस्के, सीमा पाटील, सुप्रिया गव्हाणे, यश वैद्य, राजेंद्र सवाईकर ह्यांना विशेष पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विजय शिवतारे म्हणाले, देशद्रोही विरोधकांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठ्या प्रमाणात अपप्रचार झाला, परंतु येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती होण्यासाठी हर घर सावरकर या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होईल. मराठा आरक्षणासाठी सगळ्यात मोठे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून लाभले नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे.
प्रदीप रावत म्हणाले, हिंदू प्रबोधन युगाचा अभ्यास केला पाहिजे. राजकीय हिंदुत्व सक्षम व्हायला हवे. हिंदू समाजाच्या हिताचा अजेंडा असेल तर खऱ्या अर्थाने एकत्र मूठ होईल. केवळ आपल्याला वैभवशाली वारसा आहे, यावर तग धरून चालणार नाही, वर्तमान देखील सक्षम हवे.
रवींद्र साठे म्हणाले, हिंदुत्व हे परिघाबाहेर होते, परंतु आज केंद्रस्थानी आहे, ते सावरकरांच्या विचारांमुळे. देशाला पुढे जायचे असेल तर सावरकरांच्या विचारांना पर्याय नाही. सावरकरांचे समाज चिंतनाचे पैलू आयुष्यात उतरवले पाहिजेत. समाजाविषयी संवेदना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. जातीपातीच्या वर जाऊन आपण एक व्हायला पाहिजे असेही साठे यांनी सांगितले.
केदार बापट म्हणाले, सावरकरांविषयी बोलणारे वक्ते वाढवायला पाहिजेत घराघरात त्यांचे विचार पोहोचायला हवेत. सात्यकी सावरकर म्हणाले, आज प्रभू श्रीराम यांच्या विषयी उलट सुलट बोलले जात आहे. यापूर्वी सावरकरांविषयी देखील बोलले गेले. या सर्वांना उत्तर देण्यासाठी यंत्रणा उभी राहायला पाहिजे. हर घर सावरकर समितीच्या माध्यमातून सावरकर यांचे विचार प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे


