Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२३- २४

पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२३- २४

पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२४ :- पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येणाऱे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे मुल्यांकन करणारा सन २०२३-२४ चा ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल’ आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांच्याकडे आज झालेल्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला.

 

 

 

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या विशेष बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, डॉ. ज्ञानदेव झुंजारे, संजय कुलकर्णी, उपआयुक्त मनोज लोणकर, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 

 

 

पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा, जलनि:सारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरितक्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. या सर्व सुविधांचे व्यवस्थापन करताना त्याचा शहराच्या पर्यावरणावर आणि नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. त्या दृष्टीने पर्यावरण सद्यस्थिती अहवाल महत्वपूर्ण आहे. शहराच्या शाश्वत तसेच पर्यावरणपुरक विकासासाठी हा अहवाल दिशादर्शक ठरेल, असे आयुक्त सिंह यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

महापालिकेचे विविध विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये यांच्याकडून प्राप्त झालेली पर्यावरणविषयक माहिती तसेच महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या वायू, ध्वनी, पाणी इत्यादी चाचण्यांच्या निकषांवर पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आधारित आहे, असे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

या अहवालात शहरवाढीला चालना देणारे घटक, नैसर्गिक साधनसंपत्ती व नागरी सुविधांवर पडणारा ताण, शहराची पर्यावरण सद्यस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि कृती कार्यक्रम यांची माहिती आहे. या अहवालानुसार पिंपरी चिंचवड शहरात सन २०२२–२३ मध्ये कमाल ४९७.२ मि.मी. तर किमान १.५ मि.मी. इतके पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. सन २०२२-२३ मध्ये शहराचे सर्वाधिक तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

 

महापालिका क्षेत्रात एकूण नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच इंधन प्रकारानुसार एकूण नोंदणीकृत वाहनांच्या ९ टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने असून त्यात गत वर्षीच्या तुलनेत सन २०२२-२३ मध्ये वाढ झालेली दिसून येते. गेल्या तीन वर्षात पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सी एन जी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढलेला दिसून येतो. ई-वाहन वापरण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे यातून जाणवते. दरवर्षी नव्याने नोंदणीकृत होणाऱ्या वाहनांमध्ये भर पडत असल्याने वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. याचा विचार करून पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते, उड्डाणपूल आदी उपाययोजना करत आहे. तसेच मेट्रोच्या विस्तारामुळे शहरातील वाहतूक सुविधा अधिक सुलभ होत असून वायु, ध्वनी, रस्त्यावरील ताण आणि वाहतूक कोंडी यावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

 

 

 

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी ७९.५० टक्क्के नागरिक साक्षर आहेत. त्यापैकी ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिला साक्षर असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सन २०२२-२३ मध्ये १९० उद्याने विकसित करण्यात आली असून ३२ लाख १६ हजार ७४९ झाडे लावण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे या अहवालातून दिसून येते. शहरातील कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

 

 

शहरामध्ये डिजिटल कनेक्टीव्हिटीची मागणी लक्षात घेता सार्वजनिक वाय- फाय सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत ४०० ठिकाणी वाय- फाय अॅक्सेस केंद्र उभारण्यात आले आहेत. शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धुलीकण, अतिसुक्ष्म धुलीकणांची पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार विहीत मर्यादेमध्ये असल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. धुलीकणाचे प्रमाण हे सणासुदीच्या काळात विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.

 

महानगरपालिकेच्या विविध मैलाशुद्धीकरण केंद्रांमध्ये संकलित होणाऱ्या केंद्रांमध्ये संकलित होणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानांकनानुसार गुणवत्ता राखली जाते.

 

 

 

शहरातील नद्यांच्या पाण्याची रासायनिक तपासणीची आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. नदीमध्ये जाणारे सांडपाणी, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. शहरातील सर्व नद्यांना मिळणारे नाले प्रदूषित असल्याचे या अहवालातून निदर्शनास येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने अधिकांश नाले या नदीत मिसळतात तर इंद्रायणी नदी औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने या नद्या प्रदुषित होत असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ३८ टक्के हा ओला कचरा आहे. या कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्याद्वारे ऊर्जानिर्मिती देखील करण्यात येते. तर वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा, रोजगार, व्यापार, शिक्षण,आरोग्य, क्रिडा, सांस्कृतिक तसेच मनोरंजन, क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे पिंपरी चिंचवड शहराचे आकर्षण वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

गणेशोत्सव, दिवाळी उत्सव तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यातील ध्वनी पातळीची आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात विशिष्ट ठिकाणी ध्वनी पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मानांकनापेक्षा वाढली असल्याचे अहवालात दर्शविण्यात आले आहे. महापालिकेने पर्यावरणपुरक राबविलेले उपक्रम, शासनाकडून मिळालेला निधी, विविध पारितोषिके आदी गोष्टींचा उहापोह या अहवालात करण्यात आला आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments