पुणे, दि. २८ : वनविभागातील महिलांच्या कार्यक्षेत्रातील आव्हाने व उपाययोजना याबाबत व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘वनरागिनी’ परिषद यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी (यशदा) येथे राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) श्रीमती शोमिता बिश्वास यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
या परिषदेला राज्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुंबईचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) क्लेमेंट बेन, कांदळवनचे अपर प्रधान वनरक्षक एस.व्ही. रामाराव, नाशिकचे मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, मुंबईचे मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर, ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षक श्रीमती के. प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे क्षेत्र संचालक मुख्य वनसंरक्षक श्री. मल्लिकार्जून उपस्थित होते.
या परिषदेमध्ये शस्त्र पुरविणे, शस्त्र हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, गस्तीसाठी वाहनाचा पुरवठा, ताणतणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पायाभूत सुविधा विकास यामध्ये शासकीय निवासस्थाने, हिरकणी कक्ष, महिला प्रसाधन गृह व सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट लावण्यासाठी मशीनची आवश्यकता याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ताणतणाव व्यवस्थापक शिरीषा साठे व आहारतज्ञ डॉ. अर्चना ऐनापुरे यांनीही मार्गदर्शन केले.
या परिषदेला पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या वनवृत्तातील उपवनसंरक्षक, विभागीय वन अधिकारी, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक उपस्थित होते.
00000


