पुणे, ता. ०२ – रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे प्रांत समन्वय बैठक रविवारी संपन्न झाली. आगामी वर्षे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
अशी माहिती रा.स्व. संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी दिली.
बैठकीत संघ शताब्दीनिमित्त पंच परिवर्तन संदर्भातील ज्यामध्ये समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी भाव जागृती, नागरी कर्तव्य या विषयावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यात सर्व संघटनांची भूमिका, नियोजनाची मांडणी व अंमलबजावणी यावर विस्ताराने चर्चा झाली.
त्या सोबतच हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिजन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने प्रांतभर प्रदर्शनी, व्याख्यानमाला व संबंधीत इतर उपक्रमांच्या नियोजन व अंमलबजावणीवर देखील चर्चा बैठकीत करण्यात आली.
बैठकीत उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे कार्यवाह बाळासाहेब चौधरी, पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव हे होते. सुरवातीला डॉ. दबडघाव यांनी प्रास्ताविक केले. तर समारोप सत्रात बाळासाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये दिवसभर झालेल्या या बैठकीत संलग्न विविध ४७ संस्थांचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील तीनशे वीसहून अधिक प्रमुख पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्र सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनता पक्ष, विज्ञान भारती, सहकार भारती, संस्कार भारती यासह विविध संघटनांचे प्रांत स्तरावरील पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.
प्रांत समन्वय बैठक ही वार्षिक नियोजनानुसार होत असते. त्याअनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
**


