पुणे, दिनांक १८:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे येथे करण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समिती संयोजक चित्रा दातार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक जावेद मोहनवी, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक जोशी पुथूर तसेच कॅनरा बँकच्या उपमहाव्यवस्थापक लीना पिंटो, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील म्हात्रे पुल परिसरातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात पुणे येथे करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पपेट शो तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. यादरम्यान, उपस्थितांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले संबोधनही लक्षपूर्वक ऐकत योजनेची माहिती घेतली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली होती. वात्सल्य याचा अर्थच मूळात माया आणि ममता असून त्याचे प्रतिबिंब या योजनेत दिसून येते.
ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी केवळ पेन्शन या कारणासाठी शासकीय नोकरीस प्राधान्य दिले जायचे. नंतरच्या काळात एनपीएसच्या स्वरुपात पेन्शनची संधी खासगी नोकरदारांनाही उपलब्ध करून देण्यात आली. आता अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली असून या योजनेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल, याचा विश्वास वाटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक चित्रा दातार यांनी उपस्थितांना योजनेविषयी सविस्तर माहिती देत अधिकाधिक संख्येने यामध्ये मुलांची खाती उघडण्यासाठी आवाहन केले.
एनपीएस वात्सल्य योजनेविषयी-
एनपीएस वात्सल्य ही ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान एक हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करु शकतो. मुलाच्या १८ वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे.
मुलगा १८ वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते १८ या वयोगटात उघडण्याची ही योजना असून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
०००
सुधारित बातमी
वृत्त क्र. 3192
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने जागतिक वारसा नामांकनासाठी गणेशोत्सव मिरवणुकीत जनजागृती
पुणे, दि. १८: जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत आकर्षक जागतिक वारसा रथाद्वारे लोकमान्य टिळक चौक येथे जनजागृती करण्यात आली.
यावेळी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन समितीचे किरण इंदलकर, उप जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश काळे, गणेश दानी, डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) प्राध्यापक निलेश जाधव, मे. शिवाई कृष्णा प्रा. लि.चे उदय शिंदे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, शिवदुर्गसवर्धन संस्थेचे पंडित अतिवाडकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणयुकीदरम्यान शहरातील अलका सिनेमागृह चौकात आकर्षक एलईडी स्क्रीनवर गडकिल्ल्यांची माहिती देणारे छायाचित्रण दाखविण्यात आले. यामध्ये गडकिल्ल्यांची माहिती, नकाशे, छायाचित्रे आदींचा समावेश करण्यात आला. जागतिक वारसा रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचार-प्रसार मोहिमेत डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित १२ गडकिल्ल्यांच्या माहिती दिली. नामांकनाच्या प्रसारासाठी १० हजार हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी केल्या. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे डॉ. वाहणे यांनी कळविले आहे.
0000


