*ठाणे, दि.20(जिमाका) :-* कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील ५८ महाविद्यालयांमधील केंद्रांचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के पाटील, ठाणे तहसिलदार उमेश पाटील, ठाणे खादी ग्रामोद्योग सहायक आयुक्त रमेश सुरुंग, कौशल्य विकास ठाणे सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय, सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आर.जे. ठाकूर महाविद्यालय, श्रीमती सी.एच.एम. कॉलेज, जीवनदीप कॉलेज, इंदाला, इ.महाविद्यालयांचा सहभाग असून AI सारख्या अत्याधुनिक कौशल्याचा समावेश आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
00000000000


