पुणे, ता. २७ नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या प्रो-पंजा लीगचा थरार आज, शनिवारपासून पुण्यात रंगणार आहे. पूनावाला ग्रुपच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा पूनावाला स्टड फार्म्स येथे होणार आहे.
‘प्रो-पंजा पूनावाला गोल्ड एडिशन २’च्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष योहान पूनावाला, झयान पूनावाला, प्रो-पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास आणि प्रीती झंगियानी, अजय मारवाह यांच्यासह आघाडीचे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. या प्रसंगी सहभागी खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आणि शनिवार होणाऱ्या लढतींमधील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. प्रो-पंजा लीगला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी प्रसिद्धी मिळावी, यासाठी पूनावाला कुटुंबीयांनी सातत्यपूर्ण पाठिंबा कायम ठेवला आहे. झयान पूनावाला यांची या खेळाबद्दलची आवड आणि आंतरराष्ट्रीय आर्मरेसलिंगचे सखोल ज्ञान; तसेच योहान पूनावाला आणि प्रो पंजा लीग यांच्या पाठबळामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात उतरण्यास मोठी मदत झाली आहे.
पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष योहान पूनावाला म्हणाले, ‘इतक्या कमी कालावधीत या खेळासाठी मोठे कार्य केल्याबद्दल मी प्रो-पंजा लीगचे अभिनंदन करू इच्छितो. जानेवारीमध्ये आम्ही काही आघाडीच्या भारतीय खेळाडूंसोबत एक चाचणी स्पर्धा घेतली होती आणि तो अनुभव अत्यंत शानदार होता. पडद्यावर आर्म रेसलिंग पाहणे आणि प्रत्यक्ष मैदानात पाहणे हे पूर्णपणे वेगळे अनुभव आहेत. उद्या होणाऱ्या काही रोमांचक मेगा मॅचेसची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.’
प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास म्हणाले, ‘हा आशियातील सर्वांत मोठा आणि जगातील सर्वांत मोठ्या आर्म रेसलिंग स्पर्धांपैकी एक सोहळा ठरणार आहे. आपल्या आघाडीच्या भारतीय खेळाडूंसोबत जगभरातील काही सर्वोत्तम आर्म रेसलर्स येथे स्पर्धा करत आहेत. आर्म रेसलिंग हा असा खेळ आहे जो आपण सर्वांनी शाळा आणि कॉलेजमध्ये खेळला आहे आणि त्याला या स्तरावर आणल्याचा खूप आनंद होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योहान, झयान आणि संपूर्ण पूनावाला कुटुंबाने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.’
पीपल्स आर्मरेसलिंग फेडरेशन इंडियाच्या अध्यक्ष आणि आशियाई आर्म रेसलिंग फेडरेशनच्या उपाध्यक्ष प्रीती झंगियानी म्हणाल्या, ‘जगातील काही अव्वल आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारतात आणल्याबद्दल मी योहान आणि झयान पूनावाला यांचे मनःपूर्वक आभार मानते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुरुवातीला आम्हाला अव्वल दहा देशांमध्ये स्थान मिळवण्याची अपेक्षा होती. मात्र, आमच्या भारतीय खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. पुढील दोन वर्षांत आम्ही अव्वल स्थानावर पोहोचण्याची आशा करतो. उद्या आर्मरेसलिंगची जादू दाखवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.’
स्पर्धेचे वैशिष्ट्य
– या स्पर्धेत आठ हाय-प्रोफाइल लढती रंगणार आहेत.
– प्रो-पंजा लीगच्या दुसऱ्या मोसमात यजमान भारतासह कॅनडा, अमेरिका, रशिया आणि न्यूझीलंड येथील आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत.
– या स्पर्धेचे मुख्य आकर्षण १०५ किलो वजनी गटातील लढत आहे. यात महान खेळाडू डेव्हन लॅरॅटचा मुलगा आणि कॅनडाचा ऑडेन लॅरॅट याची भारताच्या उगवत्या ताऱ्याशी, आभास राणाशी गाठ पडेल.
– ११० किलोहून अधिक गटातील दोन सह-मुख्य लढतींमध्ये न्यूझीलंडचा मातेइवारंगी हेता मॉरिस भारताच्या मजाहिर सैदूसमोर उभा ठाकेल, तर अमेरिकन आर्मरेसलर जेरेमी पार्करचा सामना भारताच्या युवराज वर्माशी होईल.
– ८५ किलो गटात रशियन आर्मरेसलिंग स्टार अकिम्बो भारताच्या स्टीव्ह थॉमसशी भिडेल.
– बॉलिवूड कलाकार परवीन डबास आणि प्रीती झंगियानी यांनी २०२० मध्ये या लीगला सुरुवात केली.
– नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्म रेसलिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. या स्पर्धेत ६५ सहभागी देशांमध्ये भारताने अव्वल पाचमध्ये स्थान पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची वाढती ताकद अधोरेखित केली आहे.
– ‘प्रो पंजा पूनावाला गोल्ड एडिशन २’ ला शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्यातील पूनावाला स्टड फार्म्स येथे सुरू होईल.
– जगभरातील क्रीडाप्रेमींना SWEN ॲप, TrillerTV आणि यू-ट्यूब वर या सर्व लढतींचे थेट प्रक्षेपण मोफत पाहता येईल.
संपूर्ण लढतींचे वेळापत्रक
लढत १ – ८५ किलो : सचिन गोयल (मध्य प्रदेश) विरुद्ध वेथोजो लोहे (नागालँड)
लढत २ – महिला ६५ किलो : मनोरमा बिश्त (दिल्ली) विरुद्ध अर्विता दत्ता (आसाम)
लढत ३ – ९५ किलो : काइल कमिंग्ज (महाराष्ट्र) विरुद्ध सतनाम सिंग (हरियाणा)
लढत ४ – महिला ६५ किलोहून अधिक : निर्मल ओलियान (हरियाणा) विरुद्ध योगेश चौधरी (हरियाणा)
लढत ५ – ८५ किलो : अकिम्बो (रशिया) विरुद्ध स्टीव्ह थॉमस (भारत)
लढत ६ – ११० किलोहून अधिक : मातेइवारंगी हेता मॉरिस (न्यूझीलंड) विरुद्ध मजाहिर सैदू (भारत)
लढत ७ – ११० किलोहून अधिक : जेरेमी पार्कर (अमेरिका) विरुद्ध युवराज वर्मा (भारत)
लढत ८ – १०५ किलोहून अधिक : ऑडेन लॅरॅट (कॅनडा) विरुद्ध आभास राणा (भारत)
विशेष पाहुणे
उपस्थिती: ॲलेक्स कुर्देचा (पोलंड)


