पुणे,24 सप्टेंबर 2024 : कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड इंटरनॅशनल (सीएसईपीआय) तर्फे 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान पीवायसी हिंदू जिमखाना येथे सेक्सकॉन 2024 या 40 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ह्युमन सेक्शुॲलिटी (मानवी लैंगिकता) क्षेत्रातील 250 हून अधिक तज्ञ सहभागी होणार असून परिषदेची संकल्पना डिजिटल युगातील लैंगिकता : तोटे आणि फायदे (सेक्शुॲलिटी इन द डिजिटल एरा : पिटफॉल्स ॲन्ड बेनिफिटस) या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पुण्यातील वरिष्ठ व प्रसिध्द सेक्सोलॉजिस्ट आणि परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ.राजेंद्र साठे म्हणाले की, परिषदेसाठी निवडण्यात आलेली संकल्पना ही आजच्या इंटरनेटच्या जगाशी संबंधित आहे. मानवी लैंगिकतेला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या युगात आपण जगत आहोत. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सादर केलेल्या संधी आणि आव्हानांचा सखोल विचार करण्यासाठी ही परिषद व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. परिषदेत सेक्सॉलॉजी क्षेत्रातील विविध विषयांचा समावेश असलेली व्याख्याने,बीजभाषणे,चर्चासत्र,कार्यशाळा आणि सादरीकरणे यांचा समावेश आहे.
सेक्शुअल मेडिसिन आणि एंड्रोलॉजी कन्सल्टंट आणि सीएसईपीआय 2024 चे आयोजन सचिव डॉ.अमित मुथा म्हणाले की, या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल युगाचा समाजावर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी सेक्सोलॉजी,मानवी लैंगिकता, सेक्शुअल मेडिसिन क्षेत्रातील तज्ञ एकत्र येणार आहेत. लैंगिक आरोग्य आणि तंदुरूस्तीच्या दृष्टीने डिजिटल माध्यमाद्वारे येणारी आव्हाने आणि संधी या दोन्हींचा सामना करण्याचे आमचे ध्येय आहे,असे डॉ.मुथा यांनी नमूद केले.
सीएसईपीआयचे इमिरेटस अध्यक्ष प्रा.डॉ.डी.नारायण रेड्डी यांनी डिजिटल जगामुळे निर्माण होणाऱ्या जोखमींवर भर दिला. डिजिटल तंत्रज्ञानाने निश्चितच आपले जीवन अधिक सुलभ बनवले आहे,मात्र यामुळे पोर्नोग्राफी आणि दिशाभूल करणारी माहिती देखील सहज उपलब्ध करून देणारी जोखीम देखील निर्माण केली आहे. अशा गोष्टी अयोग्य व चुकीच्या वर्तनांना चालना देऊ शकतात,ज्यामुळे सामाजिक जीवन धोक्यात येऊ शकते,असा इशारा त्यांनी दिला.
सीएसईपीआयचे अध्यक्ष प्रा.डॉ.जी.वेंकट रमणा यांनी डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांची लैंगिकता व्यक्त करण्याच्या,माहिती मिळविण्याच्या आणि संबंध निर्माण करण्याच्या पध्दती कशा बदलल्या आहेत या गोष्टींवर प्रकाश टाकला. ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडिया,व्हर्च्युअल रिॲलिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतच्या डिजिटल युगाने लैंगिक अभिव्यक्तीमध्ये क्रांती केली आहे. या परिषदेतील आमचे उद्दिष्ट हे केवळ संभाव्य जोखीम ओळखणे नाही तर,या तंत्रज्ञानाचे फायदे आणि संधी शोधणे देखील आहे. लैंगिकता आणि डिजिटल युग यांच्यातील संबंधाची सखोल माहिती जाणून घेऊन या गुंतागुंतीच्या विषयाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे आणि लैंगिक आरोग्याला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा हेतू आहे.
मार्च 1982 मध्ये द कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड इंटरनॅशनल (सीएसईपीआय)ची स्थापना करण्यात आली,त्याच वर्षी मुंबईत पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.सुरूवातीला इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे 1991 मध्ये नामकरण करण्यात आले.गेल्या काही वर्षांमध्ये सीएसईपीआय आता मोठ्या संख्येने सदस्य असणारी भारतातील आघाडीची लैंगिक आरोग्य संघटना बनली आहे.
या परिषदेची स्थापना प्रख्यात सेक्सोलॉजिस्ट आणि वृत्तपत्र स्तंभलेखक कै.डॉ.महिंदर वत्स याबरोबरच डॉ.आर.एच.दस्तूर,डॉ.सी.एल.झव्हेरी,श्रीमती सरला मुखी,डॉ.एस्थर दुबे,डॉ.विठ्ठल प्रभू आणि डॉ.राज ब्रह्मभट्ट यांनी
केली.


