पुणे,25 सप्टेंबर 2024 : तरूणांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने कोथरूड व्यासपीठ तर्फे पॉकेट मनीपासून समृध्दी लाखमोलाची गोष्ट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार,27 सप्टेंबर 2024 रोजी अंबर हॉल,कोथरूड येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी.ए.रचना रानडे उपस्थित राहणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्र कुलगरू डॉ.पराग काळकर आणि बँकिंग तज्ज्ञ व दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून नोंदणी अनिवार्य आहे.
याबाबत बोलताना कार्यक्रमाचे आयोजक व कोथरूड व्यासपीठाचे अध्यक्ष शाम देशपांडे म्हणाले की,आजच्या तरूणांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी योग्य पाऊले उचलून त्याद्वारे आजचा तरूण साक्षर आणि सक्षम असणे आवश्यक आहे.या कार्यक्रमाद्वारे तरूणांचा आर्थिक साक्षरता निर्देशांक (फायनान्शिअल लिटरसी इंडेक्स) तयार करण्याचा मानस आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी,नोकरी,व्यवसायाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना कार्यक्रमातील व्याख्यानांचा मोलाचा फायदा होईल याची मला खात्री आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता गुगल फॉर्म द्वारे नोंदणी गरजेची आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वेक्षणातून कोथरूडमधील तरूणांचा आर्थिक साक्षरता निर्देशांकचा विस्तृत रिपोर्ट प्रत्यक्षात प्रकाशित करण्यात येईल.
—


